मुंबई - कोविड बाधित रुग्णांकडून ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र पात्र पुरवठादार ऐनवेळी केवळ तीनशे मशीन देण्याची तयारी दाखवली आहे. याची गंभीर दखल स्थायी समितीने घेतली आहे. आधी निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार पुरवठादाराने मशीन न दिल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत ऑक्सिजनची मागणी वाढली. तर संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेने ऑक्सिजन प्लांट उभारणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र या निविदा प्रक्रियेत केवळ एकच ठेकेदार पात्र ठरला आहे. या पुरवठादाराने प्रत्येक मशिन्साठी ८९ हजार ५६९ रुपये या दराने तीन वर्षाची हमी दोन वर्षांची देखभालीसह १२०० मशिन्ससाठी दहा कोटी ४२ लाख रुपये दर आकारला होता.
यासाठी पालिकेने संबंधित ठेकेदाराशी करारही केला होता. हा प्रस्ताव कार्यत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीमध्ये बुधवारी सादर करण्यात आला होता. मात्र संबंधित पुरवठादार आता तीनशे मशीन देण्याची तयारी दाखवत आहे. तर १२०० मशिन्ससाठी दर वाढवून मागत असल्याचा आरोप सदस्यांनी केले. नियमानुसार पुरवठादाराला ठरलेल्या दरानुसार मशिन्सचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुरवठा करून घेण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले.
निविदा प्रक्रियेची चौकशी
या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या दुसऱ्या पुरवठादाराने सर्व कागदपत्र सादर केली होती. मात्र, प्रिटींग मिस्टेगचे कारण देच पुरवठादारांना पालिकेने निविदा प्रक्रियेतून बाद केले आहे. या पुरवठादाराने कमी दरात मशीन पुरविण्याची तयारी दाखवली आहे. मात्र,पालिकेच्या अधिकाऱ्याने त्याला बाद ठरवले.त्यामुळे या सर्व प्रकि्रयेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समितीने दिले.