नवी मुंबई : हैदराबादमधील दलित विद्यार्थ्याने अभाविपच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अभाविपच्या त्या नेत्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जावा व या संघटनेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी युवक काँगे्रसने केली आहे. रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. काँगे्रसने जिल्ह्यामध्ये मोर्चे काढून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. युवक काँगे्रसचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हैदराबादमधील दलित विद्यार्थ्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्याबरोबर भांडण झाले होते. यानंतर त्याला अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात झाली. त्रास सहन न झाल्याने या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत आणि या संघटनेची मान्यताच रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये ठाणे लोकसभा युवक काँग्रेस प्रभारी नंदा म्हात्रे, निशांत भगत, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ अध्यक्ष भरत पडवळ, किशोर कांबळे, विनर बिंद्रा, अमित राय, श्रद्धा पवार, रूपेश कारंडे, तुषार गायकवाड, दीपक पाठक, सचिन कांबळे, रमेश जाधव, हरिभाऊ यादव, राहुल राय, आदिल शेख, दीपक धरी, सिद्धेश माणगावकर, सुमित गांगुर्डे, विशाल वाघ व इतर उपस्थित होते.
अभाविपची मान्यता रद्द करण्याची मागणी
By admin | Published: January 25, 2016 1:29 AM