बोईसर : तारापूर एमआयडीसी क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावातून जाणारा जो प्रदूषित नाला ग्रामस्थांनी पक्के बांधकाम करून बंद केला होता तो पुन्हा सुरु करणाऱ्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात प्रदूषित रासायनिक सांडपाणी सोडले जात होते. तसेच हा नाला अरूंद झाल्यामुळे हे पाणी शेतजमीनीत पसरून त्या नापीक झाल्याने ग्रामसभेतील ठरावानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने नाल्याचे मुख्यद्वार दगडी बांधकाम करून डिसेंबर १४ रोजी बंद केले होते ते हटवून पुन्हा नाल्यावाटे पाणी सोडण्याचा प्रताप एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कोलवडेच्या ग्रामपंचायतीच्या वतीने बोईसर पोलीसांकडे केली आहे.कोलवडे ग्रामपंचायतीच्या वतीने कारवाई करण्यासंदर्भात बोईसर पोलीसांना दिलेल्या निवेदनात कोलवडे व नजिकच्या ग्रामपंचायत हद्दीतील कारखानदार त्यांच्या कारखान्यातील प्रदूषित रासायनिक पाणी कुठलीही प्रक्रिया न करता ग्रा. प. हद्दीतील मोरीखाडी या नैसर्गिक नाल्यामध्ये सोडत असल्याने या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण होऊन प्रदूषित पाणी पसरून शेतजमीन नापिक झाल्याने हा नाला त्वरीत साफ करून देण्याबाबत पर्यावरण दक्षता मंच व ग्रामसभेने ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. त्यानुसार ८ डिसेंबर २०१४ ला एमआयडीसीला पत्रान्वये कळविले. ग्रामपंचायतीने पत्र देऊनही काहीच कार्यवाही संबंधीत विभागाकडून करण्यात न आल्याने कोलवडे ग्रामपंचायतीने हा नाला ग्रामस्थांच्या मागणीनुसार व ग्रामसभेच्या ठरावानुसार नाल्याच्या मुख्यद्वारावर दगडी बांधकाम करून बंद केला होता. परंतु २३ फेब्रु. १५ रोजी दुपारच्या वेळेत हे बांधकाम एमआयडीसीने तोडले व त्यातून रासायनिक व प्रदूषित पाणी सोडले. हे पाणी पुन्हा शेतीत पसरल्यामुळे त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)
एमआयडीसी अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी
By admin | Published: February 26, 2015 11:06 PM