शाळा तोडणा-या अधिका-यांवर कारवाईची मागणी
By Admin | Published: November 7, 2014 01:31 AM2014-11-07T01:31:36+5:302014-11-07T01:31:36+5:30
धारावीतील गणेश विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे बांधकाम मुंबई महापालिकेने तोडले असून शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे,
मुंबई : धारावीतील गणेश विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे बांधकाम मुंबई महापालिकेने तोडले असून शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पाडलेले बांधकाम उभारून द्यावे, तोपर्यंत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी वर्गांची व्यवस्था करून द्यावी. तसेच शाळेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुंबई महापालिकेकडे केली आहे.
धारावीतील ४५ वर्षांपूर्वीची गणेश विद्यामंदिर ही पहिली मराठी शाळा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात तोडली आहे. शाळेचे बांधकाम सुरू असल्याने महापालिकेने नोटीस पाठविली होती. त्याप्रमाणे शाळेचे बांधकाम थांबवत व्यवस्थापनाने या नोटिसीला उत्तर दिले होते. तरीही महापालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेचे बांधकाम तोडले आहे. यामुळे शाळेतील ३०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच शाळा पाडल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक कमालीचे चिंतेत आहेत. दिवाळी सुटीनंतर शाळा शुक्रवारपासून सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, असा यक्षप्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. याबाबत शिक्षक परिषदेचे मुंबई विभागीय कार्यवाह शिवनाथ दराडे, उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी गुरुवारी शाळेला भेट दिली. प्रशासनाने शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना शाळेची माहिती दिल्यानंतर परिषदेने मुंबई महानगरपालिका आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असताना दुसरीकडे शाळेचे बांधकाम पाडून विद्यार्थ्यांना शिक्षणापासूनच वंचित ठेवणाऱ्या महापालिकेने या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत या घटनेची शासनाने दखल घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने केला आहे. (प्रतिनिधी)