विमानतळ सुरक्षेत अडथळा ठरणाऱ्या ‘त्या’ इमारतींवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:10 AM2021-08-14T04:10:33+5:302021-08-14T04:10:33+5:30

- एनजीओकडून पालिका आयुक्तांकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विमानतळ प्राधिकरणाने विमानतळ परिसरातील इमारतीच्या उंचीबाबत घालून दिलेल्या नियमांना ...

Demand for action on 'those' buildings that are a hindrance to airport security | विमानतळ सुरक्षेत अडथळा ठरणाऱ्या ‘त्या’ इमारतींवर कारवाईची मागणी

विमानतळ सुरक्षेत अडथळा ठरणाऱ्या ‘त्या’ इमारतींवर कारवाईची मागणी

googlenewsNext

- एनजीओकडून पालिका आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विमानतळ प्राधिकरणाने विमानतळ परिसरातील इमारतीच्या उंचीबाबत घालून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवत जोगेश्वरीत एकाच सिटीएसवर ‘रेहान टेरेस’ आणि ‘रेहान टॉवर’ या इमारती विकासकाने बनावट एनओसी वापरून बनवल्या. त्याविरोधात अंबोली पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यावर पालिकेने रेहान टेरेसवर कारवाई केली.

मात्र नियमभंग करणाऱ्या रेहान टॉवरला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याला ओसीही (भोगवटा प्रमाणपत्र) देण्यात आली. याबाबत गेली दोन वर्ष पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे पाठपुरावा करुनही कोणतीच कारवाई न झाल्याने खासगी एनजीओने याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे सर्व पुराव्यांसह तक्रार केली आहे.

अंधेरीतील सामाजिक सेवा फाऊंडेशन एनजीओचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर खत्री यांनी १३ जुलै २०२१ रोजी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना या भ्रष्टाचाराप्रकरणी सर्व पुराव्यानिशी एक पत्र दिले आहे. या पत्रानुसार विकासक फेअरमाऊंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी जोगेश्वरीच्या सिटीएस क्रमांक ७४, ७४/१ ते १५ या भूभागावर सीइ/९०९८/डब्लूएस/एके व सीइ/९२९६/डब्लूएस/एकेनुसार रेहान टॉवर आणि रेहान टेरेस या दोन बेकायदेशीर इमारती बांधत पालिका प्रशासनाची फसवणूक केली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि., महानगरपालिका अधिकारी आणि विकासकाने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणानुसार ‘रेहान टॉवर’ची उंची ही ८६.७५ मीटर एएमएसएल (समुद्र सपाटीपासून सरासरी उंची) आहे. विमानतळ प्राधिकरण नियमांनुसार मात्र ७४.१३ मीटर एएमएसएलपेक्षा ती अधिक असू नये, याची दखल घेत नागरी विमान वाहतूक विभागाच्या महासंचालकांनी पत्र लिहीत नियमभंग करणारे बांधकाम निष्कासीत करण्याचे आदेश पालिकेच्या के/पश्चिम विभागाला दिले. यावर विमानतळ प्राधिकरणाने १९ जून २००८मध्ये एएआय/२००११/२१२/२००८/एआरआय ही एनओसी दिली ज्यात ९५.८० मीटर एएमएसएल उंच बांधकाम करण्याची परवानगी दिल्याचे विकासकाने म्हटले.

त्यावर इमारत प्रस्ताव विभागाचे दुय्यम अभियंता नितीन सातपुते यांनी अंबोली पोलिसांना १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या जबाबात विकासकाने एएआय/२००११/२१२/२००८/एआरआय आणि बीटी१/एनओसी/सीएस/एमयुएम/११/२९२/२६२९(२७) या अनुक्रमे १९ जून २००८ आणि २७ डिसेंबर २०११ या दोन बनावटच एनओसी पालिका प्रशासनाला सादर केल्याचे सांगितले. एनओसी फसवणूकप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर विकासक कंपनीने रेहान टेरेसची एनओसी काढण्यासाठी नेमलेल्या मोहम्मद नसीम शेख याला अटक केली. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात भारतीय विमानतळ प्राधिकरणची मे २००८मधील एनओसी तीन वर्षांनी रद्दबातल झाल्याने २७ डिसेंबर २०११ रोजी एनओसीचे नूतनीकरण करण्यात आल्याचे सांगितले. यात रेहान टेरेसवर पालिकेने एमआरटीपी घेतला असून, विकासकाने याप्रकरणी कोर्टात धाव घेतल्याचे एनजीओचे म्हणणे आहे. मात्र, रेहान टॉवरला पालिकेचे अधिकारी वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘रेहान टॉवर’ला ‘ओसी’ कशी दिली?

पालिका अधिकाऱ्यानेच एनओसी बनावट असल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. मंजूर आराखड्यानुसार रेहान टॉवरची उंची ६१.३५ मीटर एएमएसएल असायला हवी, जी प्रत्यक्षात ८६.७५ मीटर एएमएसएल असूनही ४ नोव्हेंबर २०१० रोजी या इमारतीला ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) कशी देण्यात आली? याबाबत चौकशी करत विमानतळ सुरक्षेशी खेळत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

( समीर खत्री - सामाजिक सेवा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष )

फोटो : बनावट एनओसी वापरत बांधण्यात आलेल्या व विमानतळ सुरक्षेत अडथळा ठरणाऱ्या ‘रेहान टॉवर’ आणि ‘रेहान टेरेस’ इमारती

Web Title: Demand for action on 'those' buildings that are a hindrance to airport security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.