मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुंबईत बेस्टच्या काही मिनी बस रुग्णवाहिकेत बदलण्यात आल्या होत्या. तसेच, रुग्णवाहिका म्हणून वापरण्यासाठी इतर वाहनेही ताब्यात घेण्यात आली होती. मात्र, दिलादादायक म्हणजे आता रुग्णवाहिकेची मागणी कमी झाल्याचे कारण देत बेस्टच्या या मिनी बस परत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
शहरात दररोज १३०० ते १४०० रुग्ण सापडतात. त्यातील केवळ ६०० ते ७०० रुग्ण रुग्णवाहिका वापरतात, तर काही कोविड रुग्णांना होम क्वारंटाइन केले जात आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे रुग्णवाहिकांची गरज नसल्याचे सांगितले जात आहे.
सुरुवातीला कोविड रुग्ण वाढत असताना पालिकेकडील रुग्णवाहिका अपुऱ्या पडत होत्या. यासाठी पालिकेने परिवहन आयुक्तांच्या मदतीने विभागाकडून रुग्णवाहिका म्हणून इनोव्हा, महिंद्रा झायलो आणि इतर एमयूव्ही मिळवल्या. त्यासाठी काही ठरावीक रक्कमही दिली आहे. शिवाय ६० बेस्ट मिनी बसही ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सध्या अशी ६५० वाहने कोविड रुग्णवाहिका म्हणून वापरात आहेत.
१ आॅगस्टला लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही प्रभागांकडून इतक्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आठवड्यात याविषयी पालिका आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. परंतु रुग्णवाहिका कमी पडणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांनी सांगितले.
पालिकेवर आर्थिक भार
मुंबईत २४ विभाग असून प्रत्येक वॉर्डमध्ये १८ ते २० रुग्णवाहिका आहेत. बहुतेक रुग्णवाहिका दिवसातून एक किंवा दोन फेºया करतात. तरीही त्या रुग्णवाहिकांसाठी परिवहन आयुक्तांनी ठरविलेल्या दरांनुसार संपूर्ण दिवसाची रक्कम द्यावी लागते. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक भार सोसावा लागत आहे.