मुंबई : मध्य वैतरणा धरणातून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेचा प्रकल्प राज्य सरकारने पळविला आहे़ या प्रकल्पासाठी जल संपदा खात्याने दुसरी खासगी कंपनी नेमल्यामुळे मुंबई महापालिकेला माघार घेणे भाग पडले आहे़ मात्र याबाबत स्थायी समितीला माहिती देताना आयुक्त सीताराम कुंटे यांनी नाराजीही व्यक्त केली आहे़पालिकेने २००८ मध्येच मध्य वैतरणा प्रकल्प उभारताना जलविद्युत प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले होते़ मात्र राज्य सरकारने २०११ मध्ये हा प्रकल्प अन्य एका खासगी कंपनीच्या स्वाधीन केला़ जमिनीचे मालक पालिका असताना जलसंपदा विभागाने केलेल्या या अतिक्रमणामुळे प्रशासनाने यावर नाराजी व्यक्त केली आहे़ हा निर्णय अन्यायकारक असल्याची आयुक्तांची भूमिका आहे़बेस्टची वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार होता़ ५० मेगावॅट विजेची निर्मिती करून ही वीज बेस्टला विकण्याचा पालिकेचा मानस आहे़ मात्र या प्रकल्पासाठी गेली चार वर्षे पाठपुरावा करूनही पालिकेचे स्वप्न भंगले आहे़ या प्रकल्पाच्या निर्मितीची परवानगी राज्य सरकारने नाकारल्याची नाराजीही प्रशासनाकडून व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
मध्य वैतरणाच्या वीजनिर्मितीतून पालिकेची माघार
By admin | Published: January 13, 2015 1:22 AM