दोन शैक्षणिक वर्षे एकत्रित करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 01:53 AM2020-10-10T01:53:37+5:302020-10-10T01:53:45+5:30
लस येईपर्यंत शाळा बंद ठेवा
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व सुरक्षितता पाहता शाळा-महाविद्यालये दिवाळीनंतर सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून होत आहे. मात्र वॅक्सिन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास पालकांचा विरोध आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष आणि पुढील शैक्षणिक वर्ष दोन्ही क्लब करावेत आणि १ आॅगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात मुख्य सणांच्या सुट्ट्या वगळून अन्य सुट्ट्या कमी कराव्यात. अभ्यासक्रम कुठेही कमी न करता तो पुढील काळात भरून काढण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर परिस्थिती पाहून शाळा, महाविद्यालये रीतसर सुरू करावीत, आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत; आणि लस सर्व विद्यार्थ्यांना आधी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात थेट वार्षिक परीक्षा आणि १०वी, १२वीच्या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात त्या वेळची परिस्थिती बघून घेण्यात याव्यात, असे पाटील यांनी सुचविले आहे.
हे सगळे सुरळीत होईपर्यंत शिक्षकांनाही सर्व अशैक्षणिक कामातून वगळून फक्त ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात यावी. तसेच मागच्या काही महिन्यांत काही शिक्षक, कर्मचारी यांचे कोविडमुळे झालेले निधन लक्षात घेता त्यांना शाळा, कॉलेजमध्ये येण्याची सक्ती करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.