एसी, कन्व्हर्टेबल रेफ्रिजरेटर्सची मागणी वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तापमान वाढत असल्यामुळे थंडावा देणारी उपकरणे घरोघरी बसविली जात असून, एसी, रेफ्रिजरेटर्स, कुलर्स आणि पंखे यासारख्या उपकरणांची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. नुकत्याच हाती आलेल्या एका माहितीनुसार मुंबईत कुलिंग उपकरणांच्या मागणीत १.७ पट वाढ झाली असून एसी, कुलर्स, पंखे आणि रेफ्रिजरेटर्स यांच्या मागणीत अनुक्रमे २.१, १.८ आणि १.३ पटीने वाढ झाली आहे. तर, गेल्या वर्षभरात नो कॉस्ट ईएमआय या पर्यायांचा स्वीकार करण्याचे प्रमाणही २० टक्क्यांनी वाढले आहे.
सर्वेक्षण करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी बहुसंख्य ग्राहकांनी एसीमध्ये बिल्ट-इन एअर प्युरिफायर्स ही सर्वोच्च पसंतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असल्याचे सांगितले. यामुळे अनेक ब्रँड्सनी अशा प्रकारची वैशिष्ट्ये असलेले एसी बाजारात आणले आहेत. रेफ्रिजरेटर्सच्या बाबतीत एनर्जी एफिशिअंट आणि जास्त स्टोअरेज क्षमता असलेल्या कन्व्हर्टेबल श्रेणीतील रेफ्रिजरेटर्ससोबतच कर्डमेकरसारख्या मल्टि-फंक्शनल वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या रेफ्रिजरेटर्सच्या मागणीत वाढ झाली आहे.
भारतात फ्रीझरचा वापर कमी असल्यामुळे फ्रीझरच्या भागाचे सामान्य भागात रुपांतर करणाऱ्या कन्व्हर्टेबल या पर्यायाला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. काेराेना काळात दीर्घकाळ घरी राहावे लागत असल्यामुळे तसेच घरूनच काम करावे लागत असल्यामुळे अधिक साठवण क्षमता असलेल्या उपकरणांना ग्राहकांची पसंती लाभत असून, वीज बिलात बचत आणि परिचालन खर्चात कपात करण्यासाठी ग्राहक एनर्जी एफिशिअंट एसी आणि रेफ्रिजरेटर्सची निवड करत आहेत. फाईव्ह स्टार असलेल्या उच्च क्षमतेच्या उच्च एनर्जी एफिशिअंट एसींच्या मागणीत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
* अशी झाली वाढ
मागील वर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च (२०२०) महिन्याच्या तुलनेत यंदा मुंबईत कुलिंग उपकरणांच्या मागणीत १.७ पट वाढ झाली असून एसी, मौसमी उपकरणे (कुलर्स आणि पंखे) आणि रेफ्रिजरेटर्स यांच्या मागणीत अनुक्रमे २.१, १.८ आणि १.३ पट वाढ झाली आहे.