मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी करत, धनगर समाज संघर्ष समितीने मुलुंड पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्गावरील टोल नाक्याजवळील म्हाडा चौकात सोमवारी दुपारी १२ वाजता महायुतीने दिलेल्या वचननाम्याची होळी केली. यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आक्रमक झालेल्या धनगर समाजाने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत, ‘देता की जाता’ असा नारा दिला आहे.संघर्ष समितीचे अध्यक्ष व खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांत हे आंदोलन झाले. महात्मे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीआधी महायुतीने धनगर आरक्षणाबाबत लिखित आश्वासन दिले होते. या वचननाम्यात ‘मेंढपाळ आयोग’ (शेफर्ड कमिशन)ची स्थापना करण्याचेही आश्वासित केले होते. मात्र, काहीही कारवाई झाली नाही. त्यानंतरही सरकारने वारंवार आरक्षण देऊ, असेच सांगितले. टीसचा अहवाल येऊन तीन महिने होऊनही कारवाई झाली नाही. याउलट मराठा आरक्षणाबाबत सरकारने तत्परता दाखविली. आता धनगर आरक्षणाचा विषय पुढील अधिवेशनापर्यंत पुढे ढकलला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही, असे महात्मे म्हणाले.धनगर आरक्षण अंमलबजावणीवर तत्काळ कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा पातळीवर लक्षवेधी आंदोलन केले जाईल. यावेळी महायुतीच्या वचननाम्याची होळी करू, असे समितीने स्पष्ट केले.मुलुंड पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्गावरील टोल नाक्याजवळील म्हाडा चौकात सोमवारी दुपारी १२ वाजता धनगर समाजाने महायुतीने दिलेल्या वचननाम्याची होळी केली.
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे ‘देता की जाता?’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:55 AM