Join us  

साठवणुकीसाठी सुक्या मासळीला मागणी

By admin | Published: May 25, 2014 12:41 AM

डहाणू तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या चिंचणी, डहाणूगाव, डहाणूस्टेशन, कासा येथील सुक्या मासळीचा बाजार गजबजू लागला आहे,

डहाणू : पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळ्यापूर्वीच्या साठवणुकीसाठी डहाणू तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या चिंचणी, डहाणूगाव, डहाणूस्टेशन, कासा येथील सुक्या मासळीचा बाजार गजबजू लागला आहे, शिवाय डहाणू, वानगांव, बोर्डी, वरोती, कासा येथील आठवडे बाजारात सुकी मासळी खरेदी करण्यासाठी जंगलपट्टी भागातील आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरीकांची झुंबड उडत आहे. पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रातील मत्स्य संवर्धन व्हावे व मत्स्य संपदेत वाढ व्हावी, यासाठी १५ मे पासून समुद्रातील सर्व प्रकारची मासेमारी बंद करण्याचा निर्णय विविध मच्छीमार संघटनांनी घेतला. डहाणू बंदरातील सुमारे ५००-६०० लहानमोठ्या बोटी किनार्‍यावर उभ्या आहेत. त्यामुळे रोजच्या रोज पापलेट, सुरमई, हलवा, घोळ, दाढा, रावस खाणार्‍या खवय्यांचे तीन चार महिने हाल होणार आहेत. सध्या तालुक्यातील मुख्य बाजारपेठेत सुकी मासळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. विशेष म्हणजे डहाणूतील शेकडो नागरीक पावसाळ्यासाठी गुजरात राज्यातील खतलवाडा, संजाण, मरोली, दमण येथे सुकी मासळी घेण्यासाठी जात असतात. येथील सुके पापलेट, घोळ, दाढा, सुरमई प्रसिद्ध असून स्वस्तही असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे. वर्षभरात राज्यभरात मत्स्य दुष्काळ सारखी परिस्थिती आहे.