मुंबई : लॉकडाउनमुळे राज्यातील उद्योगांची धडधड बंद झाल्यामुळे विजेच्या मागणीत लक्षणीय घट झाली होती. महागडी वीज खरेदी करणारा औद्योगिक ग्राहक दुरावल्याने महावितरणचे आर्थिक गणित कोसळले होते. मात्र, ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये परवानगी मिळाल्यानंतर राज्यातील उद्योग चक्राला गती मिळाली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे दीड हजार मेगावॅट वाढ झाली असून महावितरणलाही काहीसा दिलासा मिळाला आहे.लॉकडाउन सुरू असताना १३ एप्रिल रोजी राज्यातील विजेची मागणी दिवसभरातील चार टप्प्यांमध्ये अनुक्रमे १७६७५, १७८२४, १४९८२ आणि १५३१८ मेगावॅट होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उद्योगांना परवानगी देण्यास सरकारने सुरुवात केली आहे.परवानगी मिळालेल्या ६५ हजार उद्योगांपैकी ३५ हजार ठिकाणी उत्पादन प्रक्रिया सुरू झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे १४ मे रोजी राज्यातील विजेची मागणी १८५८०, १९३७०, १६७७४ आणि १६५७४ मेगावॅटपर्यंत वाढली. ही सरासरी वाढ १२२० मेगावॅट असून पिक अवर्समधील वाढ १५२८ मेगावॅट नोंदविण्यात आली आहे.तोट्यात घट होण्याची अपेक्षामुंबई शहरात रेड झोन असल्यामुळे तिथल्या मागणीत जेमतेम २२० मेगावॅटची वाढ झाली आहे. राज्यातील कृषी आणि घरगुती वीज ग्राहकांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. त्यासाठी उद्योगांना चढ्या दराने वीज पुरविण्याचे धोरण आहे. मात्र, बंद उद्योगांमुळे महावितरणचे क्रॉस सबसिडीचे गणित कोसळले होते. वीज खरेदी आणि विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात मोठी तफावत निर्माण झाली होती. मात्र, आता उद्योगांकडील विजेची मागणी वाढू लागल्यानंतर ती तूट कमी होईल. तसेच, वीज कंपन्यांच्या तोट्यातही घट होईल, अशी अपेक्षा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील उद्योगचक्राला गती, विजेची मागणी दीड हजार मेगावॅटने वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 1:23 AM