मुंबई : अतिवृष्टीच्या संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विजेच्या मागणीत घट झाल्याने महानिर्मितीला देखील आपले वीज उत्पादन त्या प्रमाणात कमी करावे लागले होते. तथापि, आता उद्योगधंद्याचे चक्र गतिमान होऊ लागल्याने गेल्या ३-४ दिवसांपासून विजेची मागणी सरासरी सुमारे २१,००० मेगावॅट इतकी वाढली असून या वाढीव मागणीची पूर्तता करण्यासाठी महानिर्मितीने तातडीचे योगदान देत १० ऑगस्ट रोजी सुमारे ७,१२९ मेगावॅट इतक्या लक्षणीय प्रमाणात वीजनिर्मिती साध्य केली.
कोराडी वीज केंद्र-१,८७२ मेगावॅट, खापरखेडा वीज केंद्र-१,११४ मेगावॅट, चंद्रपूर वीज केंद्र-१,८८४ मेगावॅट, भुसावळ वीज केंद्र-१०३१ मेगावॅट, परळी वीज केंद्र-६५८ मेगावॅट, पारस वीज केंद्र-२३५ मेगावॅट व नाशिक वीज केंद्र-३३५ मेगावॅट अशा प्रमाणात वीजनिर्मिती करण्यात आली. महानिर्मितीने गेल्या ३-४ दिवसापासून शिखर मागणीत सरासरी ६,५०० ते ७,००० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती साध्य करून आपल्या त्याआधीच्या दैनंदिन वीजनिर्मितीत दुपटीने वाढ केली आहे.
गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्याने, एरव्हीच्या शिखर मागणीच्या तुलनेत विजेची मागणी खालावून १६,०००-१७,००० मेगावॅट इतकी झालेली होती. परिणामस्वरूप महानिर्मितीचे वीज उत्पादन देखील सरासरी जेमतेम ३,५०० मेगावॅट इतके झाले होते. तथापि, आता जनजीवन पूर्वपदावर येत असताना आपले ब्रीद जपत राज्यातील वीज ग्राहकांना महानिर्मितीने नक्कीच दिलासा दिला आहे.आता सद्यस्थितीत महानिर्मितीचे बहुतांशी औष्णिक संच मेरिट ऑर्डर डिस्पॅच तत्वानुसार महावितरणच्या शेड्युलमध्ये असून आगामी काळात गरज पडल्यास सुमारे १०,००० मेगावॅट वीजनिर्मिती देखील साध्य करण्यासाठी महानिर्मिती सुसज्ज आहे, असे प्रतिपादन महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी केले आहे.
आपापले वीज संच उत्तम सुस्थितीत राखून विनाव्यत्यय कार्यरत ठेवल्याबद्धल त्यांनी महानिर्मितीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कोरोना संकटाची तीव्रता आता हळूहळू कमी होत असताना वाढीव वीजनिर्मितीच्या माध्यमातून महानिर्मितीच्या महसूल वाढीला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना केले आहे.