मुंबई : शासकीय मका खरेदी योजनेत आॅनलाइन नोंदणीच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला राज्यात अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो शेतकरी नोंदणी करू शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे अजून मका बाजारात येत असल्याने सरकारने आॅनलाइन नोंदणीला फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.खासगी बाजारात मक्याला अपेक्षित भाव नसल्याने राज्य सरकारने किमान आधारभूत योजनेखाली नोव्हेंबरपासून राज्यात मका खरेदी केंद्रे सुरू केली. सरकारने मक्याला क्विंटलमागे १४२५ रुपये हमीभाव दिल्याने खासगी व्यापारी १२०० रुपयांपर्यंत भाव देत आहेत. शेतक-यांनी मक्याची नोंदणी केलेली असली तरी अनेकांच्या मालाचे अजून काटे झालेले नाही. त्यातच ३१ डिसेंबरला आॅनलाइन नोंदणीच्या शेवटच्या दिवशी सर्व्हरच बंद पडल्याने अनेक शेतक-यांना माघारी फिरावे लागले.शेतकरी टप्प्याटप्प्याने मका काढत आहेत. राज्यात मक्याचे चांगले उत्पादन झाल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात माल बाजारात येणार आहे. त्यामुळे आॅनलाइन नोंदणीला मुदतवाढ देण्याबरोबरच मक्याची यापुढेही हमीभावाने खरेदी केल्यास शेतक-यांना दिलासा मिळेल.------------------हमीभावाने खरेदी बंद झाल्यास व्यापारी मक्याचे भाव पाडतात, असा अनुभव आहे. त्यामुळे किमान फेब्रुवारी अखेरपर्यंत नोंदणीला व मका खरेदीला मुदतवाढ देण्याची गरज आहे. सर्व्हर बंद पडल्याने अनेक शेतक-यांना 31 डिसेंबरला आॅनलाइन नोंदणी करता आलेली नाही.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड
आॅनलाइन नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी, 31 डिसेंबरला सर्व्हर पडले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 11:23 PM