कलागुणांसाठी मुदतवाढीची मागणी, शिक्षणमंत्र्यांना मुख्याध्यापक संघटनेचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 04:22 AM2020-01-11T04:22:08+5:302020-01-11T04:22:13+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षेचे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय परीक्षा मंडळ आणि शिक्षण विभागाने घेतला.
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षेचे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय परीक्षा मंडळ आणि शिक्षण विभागाने घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही, विद्यार्थी त्यापासून वंचित तर राहत नाहीत ना, याकडे मंडळाचे आणि शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
यंदा उशिरा झालेल्या परीक्षेमुळे या परीक्षांचा निकाल उशिरा लागणार आहे. तो निकाल विद्यार्थी, शाळांकडे येईपर्यंत आणि बोर्डाला सादर करेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत संपत असल्याने, हजारो विद्यार्थी कलागुणांपासून वंचित राहण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्याध्यापक संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन ही मुदत ३० मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे.
या गुणांचा लाभ मिळविण्यासाठी बोर्डाकडे यासंबंधी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांमार्फत पाठविण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत आहे. मुळात सप्टेंबरपर्यंत होणारी ही परीक्षा यंदा उशिरा झाली. या परीक्षेचा निकाल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतर, तो केंद्रांकडे आणि मग शाळांकडे पोस्टामार्फत येईल. मुळात या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये इंटरमिजिएट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे, परंतु त्याचे वाढीव गुण त्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. ते नुकसान होऊ नये व त्यांना परीक्षेचे गुण मिळावेत, यासाठीही प्रस्ताव पाठविण्याची तारीख कायमची वाढविण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ही मुदतवाढ वाढवावी आणि विद्यार्थ्यांच्या गुणांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली आहे.
>इंटरमिजिएट परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत त्यांना समस्या सांगितली. त्यांनी तत्काळ कार्यवाही करून बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचे आश्वासन आमच्या शिष्टमंडळाला दिले.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुख्याध्यापक संघटना