महापौरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:32 AM2019-08-08T01:32:49+5:302019-08-08T06:25:48+5:30
निर्मलमगर पोलिसांना दिले लेखी पत्र
मुंबई: शॉक लागून मृत्यू झालेल्या आई आणि मुलाच्या मृत्यूचा जाब विचारणाऱ्या महिलेचा हात पिळत तिच्याशी असभ्यपणे वागणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई महिला काँग्रेसने बुधवारी केली. त्यांच्या कृत्याची व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यानंतरही याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देणारे लेखी पत्र त्यांनी निर्मलनगर पोलिसांना दिले आहे.
मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अजंता यादव यांनी बुधवारी निर्मलनगर पोलिसांची भेट घेत त्यांना एक लेखी पत्र दिले. महापौरांनी त्यांच्याच विभागात योग्य त्या उपाययोजना न केल्याने पाणी भरून शॉर्टसर्किट होऊन दोघांना जीव गमवावा लागला. त्याबाबत ज्या महिलेने त्यांना जाब विचारला तिचा हात पिळला. त्यानंतर, प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मी कुठे काय केलेय ते मला दाखवा, असे वक्तव्यही केले आहे. त्यांच्या या कृत्याची क्लिप फिरत असल्याने याबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तरीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, याबाबत चीड व्यक्त केली आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापौरांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा त्यांच्याच पक्षाचा महापौर महिलाबाबत गैरवर्तन करतो, असा संदेश जाईल. निर्मलनगर पोलिसांनी सुमोटो तत्त्वावर महापौरांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे, तसेच गुरुवारपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.