मुंबई : क्यार व महा या चक्रीवादळांमुळे व अतिवृष्टीमुळे मासेमारीचा ९० दिवसांचा हंगाम वाया गेला आहे. परिणामी, मुंबईतील ३४ कोळीवाड्यांमधील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्सोवा हे मुंबईतील मोठे बंदर असून तेथे ३५० मच्छीमार नौका आहेत. येथील मासेमारी धंद्यावर अवलंबून तीन हजार मच्छीमार कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांचे ५० कोटींचे नुकसान झाले आहे.मुंबईत ३४ कोळीवाडे आहेत. या कोळीवाड्यांमध्ये मासेमारीसह मासे सुकविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. १ आॅगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला, परंतु अतिवृष्टीमुळे वाळत घातलेले सर्व मासे वाहून गेले. परिणामी, मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमारांच्या कुटुंबीयांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने सोमवारी मढ येथे शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली.सोमवारी दुपारी मढ येथील हॉटेलमध्ये जाऊन महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी शिवसेनेच्या आमदारांची भेट घेऊन त्यांना मच्छीमारांना आर्थिक मदत करण्याची आग्रही मागणी केली. मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाबाबत कोळी यांनी माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार वैभव नाईक ाांची भेट घेतली.>गजानन कीर्तिकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेटजशी शेतकऱ्यांना दुष्काळात आर्थिक मदत मिळते, तशी मुंबईतील मच्छीमार बांधवांना आर्थिक नुकसानभरपाई द्या, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने खासदार गजानन कीर्तिकर यांनी उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन यासंदर्भात निवेदन दिले. कीर्तिकर यांच्यासोबत शिवसेना विधानसभा संघटक यशोधर फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये उपस्थित होते. या वेळी सात बंगला सागर कुटीर येथील सागरी किनारा संरक्षक बंधारा बांधताना बाधित असलेल्या ४७ जणांना निवासी घर देण्यासंबंधीची मागणीही खासदार कीर्तिकर यांनी उपनगर जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
मच्छीमार बांधवांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:18 AM