प्रश्नातील संदिग्धतेमुळे एक गुण देण्याची मागणी, दहावीच्या विज्ञान विषयाच्या परीक्षेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:57 AM2024-03-21T05:57:07+5:302024-03-21T05:57:17+5:30
या प्रश्नाबाबत अनेक पालकांनी शंका उपस्थित केली. विद्यार्थ्यांकरिता एकेक गुण महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याचे गुण दिले जावे, अशी मागणी पालक करत आहेत.
मुंबई : दहावी विज्ञान- १ विषयाच्या १८ मार्च रोजी झालेल्या परीक्षेतील एक प्रश्न संदिग्ध असल्याने त्याचा एक गुण विद्यार्थ्यांना दिला जावा, अशी मागणी होत आहे. प्रश्न क्रमांक १ (बी) मधील पहिल्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता त्याचे अचूक उत्तर ‘हायड्रोजन’ हे आहे. मात्र काही शाळांमध्ये याचे उत्तर ‘हेलियम’ असल्याचे तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे सांगण्यात येत आहे. संभ्रमाची स्थिती आहे.
या प्रश्नाबाबत अनेक पालकांनी शंका उपस्थित केली. विद्यार्थ्यांकरिता एकेक गुण महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याचे गुण दिले जावे, अशी मागणी पालक करत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल.
पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी करू नयेत, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी बोर्डाकडे पत्र लिहून केली आहे.