राज्य नाट्यस्पर्धेऐवजी बालनाट्य महोत्सव हवा, बाल रंगभूमी परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 08:34 AM2022-04-13T08:34:13+5:302022-04-13T08:35:08+5:30

बालरंगभूमी आज अनेक आव्हानांचा सामना करत अखंडित कलाकार-तंत्रज्ञ घडवण्याचे काम करत आहे; मात्र बाल राज्य नाट्य स्पर्धेत घडणारे काही गैरप्रकार म्हणजे बालनाट्याच्या चळवळीला लागलेली एक कीड आहे.

Demand for Childrens Theater Council instead of State Drama Competition | राज्य नाट्यस्पर्धेऐवजी बालनाट्य महोत्सव हवा, बाल रंगभूमी परिषदेची मागणी

राज्य नाट्यस्पर्धेऐवजी बालनाट्य महोत्सव हवा, बाल रंगभूमी परिषदेची मागणी

googlenewsNext

संजय घावरे

मुंबई :

बालरंगभूमी आज अनेक आव्हानांचा सामना करत अखंडित कलाकार-तंत्रज्ञ घडवण्याचे काम करत आहे; मात्र बाल राज्य नाट्य स्पर्धेत घडणारे काही गैरप्रकार म्हणजे बालनाट्याच्या चळवळीला लागलेली एक कीड आहे. याच कारणामुळे यापुढे सरकारने बालनाट्य स्पर्धा आणि नाट्य संमेलनाऐवजी बाल नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्याची मागणी बाल रंगभूमी परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचाच घटक असणारी बाल रंगभूमी परिषद मागील तीन वर्षांपासून बालनाट्यांसमोरील आव्हाने दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बाल नाट्यमहोत्सवाच्या आयोजनाबाबत परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी म्हणाले की, मुलांच्या भावविश्वात स्पर्धेपेक्षा बालनाट्य महोत्सवाला महत्त्व द्यायला हवे. यासाठी स्पर्धेचे स्वरूप बदलून प्रत्येक जिल्ह्यात नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. यातून बरेच नवीन कलाकार घडतील. फेब्रुवारी २०१९मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे लातूरमध्ये आम्ही याबाबत मागणी केली होती. या संदर्भातील कागदपत्रे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडेही पाठवली; पण अद्याप सरकारकडून काही उत्तर आलेले नाही. कोरोनानंतर यावर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या आहेत; पण अंतिम फेरीनंतर पुढील वर्षांपासून स्पर्धेचे स्वरूप बदलून नाट्यमहोत्सव करावा.

परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार म्हणाले की, यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने बाल नाट्य संमेलने केली आहेत. बाल रंगभूमी परिषद स्थापन झाल्यावर बाल नाट्यसंमेलन झालेले नाही; पण संमेलनाऐवजी बाल नाट्यमहोत्सव व्हायला हवेत. प्रत्येक जिल्ह्यात बालनाट्यांचे आयोजन करणे बाल रसिकांसाठी फायदेशीर ठरेल. यातून चळवळीलाही गती मिळेल आणि जिल्हा पातळीवर बाल कलाकार प्रकाशझोतात येतील. तेथील नाट्यसंस्थांनाही प्रयोग करण्याची संधी मिळेल. एकाच ठिकाणी बाल नाट्यसंमेलनावर अमाप खर्च करण्यापेक्षा तो विभागला जाईल व त्याचा फायदा बाल नाट्यसंस्थांसोबत बाल नाट्यांनाही होईल.

बालनाट्य महोत्सव का हवा? 
राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरकारकडून प्रवास भत्त्यासोबत प्रयोगाचा खर्चही मिळत असल्याचा काही जण गैरफायदा घेतात. वेगवेगळ्या नावाने पाच-सहा एण्ट्री घेतात. मुलांना संधी देऊ, असे सांगून पालकांकडूनही पैसे उकळतात. स्पर्धेत क्रमांक येण्यासाठी चिरीमिरी देण्याचा प्रकार होतो. परीक्षकांचा निर्णय खिलाडूवृत्तीने न स्वीकारता काही जण न्यायालयातही जातात. यामुळे मुलांवरही चांगले संस्कार होत नाहीत. हे थांबण्यासाठी नाट्यमहोत्सव भरवायला हवा.

Web Title: Demand for Childrens Theater Council instead of State Drama Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक