मुंबई :
राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे. मुंबई वगळून राज्यभरातून २२ हजार मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात येत असून, पुरवठाही मागणीनुसार केला जात आहे. मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली असून, ३ हजार मेगावॅटवर नोंदविण्यात आली आहे.
मुंबईतल्या वाढत्या उकाड्यामुळे विजेच्या मागणीत आणखी वाढ होईल. मुंबईत विजेची मागणी पावणेचार हजार मेगावॅटच्या आसपास नोंदविण्यात येईल, तर उर्वरित राज्यात विजेची मागणी २५ हजार मेगावॅटवर नोंदविण्यात येईल. विजेच्या वाढत्या मागणीनुसार पुरवठा केला जाईल. परिणामी भारनियमनाचा प्रश्न उद्भवणार नाही, असा दावा महावितरणने केला आहे. सोमवारी मुंबई वगळून राज्यात २१ हजार ६६१ मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. दुपारी विजेच्या मागणीत १ हजार मेगावॅटने वाढ नोंदविण्यात आली. राज्यात २२ हजार ५५५ मेगावॅट एवढी सरासरी विजेची मागणी नोंदविण्यात आली.
कोळसा टंचाई नाही विजेची मागणी वाढल्यास महावितरण वीज विकत घेते. शिवाय पंजाब, चंडीगड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशला त्यांच्याकडील मागणीनुसार महावितरणकडून वीज दिली जाते. जेव्हा राज्याला वीज कमी पडते तेव्हा त्यांच्याकडून वीज घेतली जाते. गरजेनुसार देवाण - घेवाण केली जाते; त्याला बँकिंग असे म्हटले जाते. सध्या कोळशाची टंचाई नाही. तांत्रिक बिघाड वगळता २४ तास विजेचा पुरवठा केला जात आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
मुंबईत सध्या विजेची मागणी ३ ते ३ हजार ५०० मेगावॅट आहे. राज्यात दिवसा २२ हजार मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली, तर रात्री मागणी सुमारे २ हजाराने कमी होते. अवकाळी पावसाचे वातावरण निवळल्यानंतर २५ हजारांच्या आसपास विजेची मागणी नोंदविण्यात येईल.