Join us

महामुंबईत वाढतेय घरांची मागणी, तीन महिन्यांत २० हजार नवे प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:13 AM

तीन महिन्यांत २० हजार नवे प्रकल्प; वन-टूबीएचकेला मोठी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळात मंदावलेले अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत असून, याचे संकेत मुंबई आणि महामुंबई परिसरात घरांच्या वाढत्या मागणीतून मिळत आहेत. बांधकाम क्षेत्राशी निगडित एका अग्रगण्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महामुंबईत २० हजार नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा झाली आहे, तसेच या घरांच्या बुकिंगसाठी लोकही उत्तम प्रतिसाद देत आहेत.

संबंधित सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून महामुंबईतील घरांनी विक्रीचा जोर पकडल्याचे चित्र होते, तर सध्याच्या दुसऱ्या तिमाहीत हा वेग गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे  १० टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजेे, ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेत, एमएमआर क्षेत्रात तब्बल  २० हजार नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ग्राहकांची घर घेण्याची इच्छा आणि क्रयशक्ती हे मुद्दे विचारात घेत, बिल्डर मंडळींनी आता आलिशान आणि फोर किंवा फाइव्ह बीएचके घरांची बांधणी करण्याऐवजी वन-बीएचके, टू-बीएचके घरांच्या निर्मितीवर अधिक जोर दिला आहे. अर्थात, घरांच्या किमतीही मुंबई शहर आणि उपनगरांत कोटीच्या उंबरठ्यावर असल्या, तरी मुंबईखेरीज एमएमआर 

क्षेत्रात ही घरे ४० लाख ते ७५ लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध होत आहेत. त्यातच आगामी काळात असलेल्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळींनीही आकर्षक योजना सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. स्कूटर, फ्रीजसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वितरणापासून ते स्टॅम्प ड्युटीमधील काही रक्कम बिल्डर मंडळींनी भरण्याच्या योजना सादर केल्या जाणार असल्याचे समजते. 

वन-बीएचके घरांना ग्राहकांची पसंती

 घोषित झालेल्या या २० हजार गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये वन-बीएचके घराची संख्या ६० टक्क्यांच्या आसपास आहे, तर टू-बीएचके घरांची संख्या २९ टक्क्यांच्या आसपास आहे. उर्वरित ११ टक्के घरांमध्ये थ्री-बीएचके, फोर-बीएचके, फाइव्ह-बीएचके घरांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत व्याजदरात १ टक्क्यांपर्यंत वाढ झालेली असली, तरी कोरोनातील दोन वर्षांच्या काळानंतर प्रथमच कोरोना पूर्व काळाप्रमाणे बांधकाम क्षेत्रामध्ये धिम्या पावलाने तेजीचा प्रवेश होताना दिसत आहे.

 

टॅग्स :मुंबईसुंदर गृहनियोजन