मुंबई : मागील काही वर्षांपासून गोपाळकाला उत्सव राजकारण्यांसाठी शक्तिप्रदर्शनाचे जणू व्यासपीठ बनले आहे. यात कोण बाजी मारतो, याकडे सर्वांचेच लक्ष असते. यासाठी सेलिब्रेटींवर लाखो रुपये खर्च केले जातात. यंदाच्या उत्सवात मोठ्या हंड्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काही वर्षांपासून लाखोंच्या हंड्या बांधून कलाकारांना मनोरंजनासाठी बोलविण्याचा ट्रेंड सुरू आहे. मुंबई-ठाण्यातील बऱ्याच आघाडीच्या राजकारण्यांसाठी हा उत्सव शक्तिप्रदर्शनाचा आखाडा बनला असून, हिंदी-मराठीतील कलाकारांना सुपाऱ्या दिल्या जातात. एक कलाकार एका दिवशी जास्तीत जास्त चार हंड्यांना पोहोचू शकतो. हंड्यांसाठी मराठी कलाकारांना ४०-५० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. हिंदी कलाकारांची गणिते वेगळी असून, काहीजण राजकीय नातेसंबंधांमुळे, तर काही मनाजोगती रक्कम मिळाल्याने दहीहंडीला पाहोचतात.
कोणता कलाकार कोणत्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार, याबाबत कमालीची गुप्तता राखण्यात येते. एखादा राजकारणी जास्त पैसे देऊन कलाकार पळवू नये, याची काळजी घेतली जाते. काही कलाकार चित्रपटांच्या प्रमोशनसाठी, तर काही आयडीलसोबतच्या ऋणानुबंधामुळे येतात, असेही ते म्हणाले. यंदा प्रथमेश परब, शर्मिष्ठा राऊत, योगेश शिरसाठ, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, विदिशा म्हैसकर, अमृता धोंगडे, रीना मधुकर, धनश्री काडगावकर, मधुरा जोशी, हेमलता बाणे - पाटकर, गौरी कुलकर्णी, रोहित राऊत हे कलाकार गोविंदांचा उत्साह वाढविणार आहेत.
सध्या सेलिब्रिटींना पोहोचणेही मुश्कील
यंदा चित्रपटांपासून मालिकांमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कलाकारांना मागणी आहे. यात पूजा सावंतला डिमांड असून, नृत्यांगना गौतमी पाटील नॉट रिचेबल आहे. गौतमीकडे फोन घ्यायलाही वेळ नाही. गौतमीभोवती जमा असलेला गोतावळाच ते हँडल करत असल्याने तिच्यापर्यंत पोहोचणेही मुश्किल झाल्याचे सेलिब्रिटी मॅनेज करणाऱ्यांचे म्हणणे आहे. दादरमधील आयडीयल बुक डेपोच्या हंडीत सर्वप्रथम कलाकार हजेरी लावू लागले. येथे मागच्या वर्षी अफझल खानाच्या वधाचा सजीव देखावा होता. यंदा स्त्री जागरूकता विषय असेल, असे आयडीयलचे संचालक मंदार नेरूरकर यांनी सांगितले.