पाचवी, आठवीत अनुत्तीर्ण झालेल्यांची पुनर्परीक्षा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:09 AM2024-05-29T10:09:33+5:302024-05-29T10:13:57+5:30
लोकसभा निवडणूक प्रशिक्षण आणि निवडणूक ड्युटीमुळे सर्व शिक्षकांना उन्हाळी सुट्टीतही आपल्या मूळगावी जाणे शक्य झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इयत्ता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यंदापासून पाचवी-आठवीला वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. मात्र त्या आधी एकदा पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे. ही पुनर्परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेऊन १५ जूनपूर्वी निकाल लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. थोड्याफार फरकाने संपूर्ण राज्यात उन्हाळी सुट्टीत लोकसभा निवडणुका होत्या.
लोकसभा निवडणूक प्रशिक्षण आणि निवडणूक ड्युटीमुळे सर्व शिक्षकांना उन्हाळी सुट्टीतही आपल्या मूळगावी जाणे शक्य झाले नाही. कौटुंबिक कार्यक्रम, नातेवाइकांच्या भेटी, यामुळे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिक्षक मूळ गावी गेले असल्याची माहिती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे विभाग संघटक प्रवीण पुरी यांनी दिली.