काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी?, 'या' नेत्याचं सूचवलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:49 PM2023-06-20T21:49:23+5:302023-06-20T21:59:41+5:30
विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी दावा करणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती
मुंबई - शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आमदार मनिषा कायंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची विधान परिषदेतील एक जागा कमी झाली आहे. आता यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला सोडावे लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे, आता या पदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दावा केला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, काँग्रेसच्या जिल्हा सचिवाचे तसे पत्रच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी दावा करणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आम्ही अजुनही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी विचार केलेला नाही. आम्ही आता या पदासाठी विचार करणार. ज्यांच्या अधिक जागा असतात त्यांना विरोधी पक्षनेते पद असते, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं होतं. आता, अकोल जिल्हा काँग्रेस सचिव रविंद्र तायडे पाटील यांच्या नावाने एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामध्ये, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री सजेत पाटील यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तायडे पाटील यांनी थेट काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडेच पत्राद्वारे ही मागणी केली आहे. रविंद्र तायडे पाटील यांनी या मागणीसंदर्भातील एक ट्विटही ट्विटर अकाऊंटवरुन रिशेअर केलं आहे. त्यामुळे, आता काँग्रेसनेही विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदाच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसून येतंय.
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांच्या पक्षांतरामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटातील आमदारांची संख्या नऊवर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील एकजूट अभेद्य राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे होते. परंतु आता काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता पदावर सतेज पाटिल यांची नियुक्ती करा, अशा मागणीचे पत्र सोशल मीडियावर वायरल होत आहे. तर, काँग्रेस कार्यकर्तेही या मागणीसाठी आग्रही दिसून येत आहेत.
दरम्यान, अद्याप मनिषा कायंदे ह्या अधिकृतपणे शिवसेना ठाकरे गटाच्याच विधानपरिषद सदस्य आहेत. त्यांची कुठेही शिवसेना आमदार पदावरुन संख्या कमी झाली नाही. त्यामुळे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदाच्या बदलाचा सध्या कुठलाही विषय नसल्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले होते.