विद्युत दाहिनीपेक्षा लाकडांचीच अंत्यसंस्कारासाठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:54 AM2018-10-20T00:54:59+5:302018-10-20T00:55:24+5:30
सरण रचण्यावरच भर : तीन लाख क्विंटल लाकडाचा पुरवठा महापालिका करणार
मुंबई : पर्यावरणाचा ºहास व प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने स्मशानभूमीत विद्युत दाहिनी, गॅस दाहिनीची सोय केली आहे. मात्र, आजही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचे सरण रचण्यावरच नातेवाइकांचा भर आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांसाठी तब्बल तीन लाख क्विंटल जळाऊ लाकडाचा पुरवठा महापालिका स्मशानभूमीमध्ये करणार आहे.
महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेहांच्या अंत्यसंंस्कारासाठी मोफत जळाऊ लाकडांचा पुरवठा केला जातो. मात्र, एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ३०० किलो लाकूड लागते. त्यामुळे लाकडांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने ११ ठिकाणी विद्युत दाहिनी सुरू केल्या. या विद्युत दाहिनींचे आणि पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) दाहिनीमध्ये परावर्तन करण्यात आले आहे, तर एकूण ४४ ठिकाणी गॅस दाहिनी बसविण्याचे काम सुुरू आहे.
पालिका विद्युत दाहिनी, गॅस दाहिनीवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. यामुळे वीजबचत व पर्यावरणाचा ºहास रोखता येणार आहे. मात्र, अंत्यसंस्कारांसाठी लाकडांचे सरण रचण्याचा पारंपरिक पर्यायच नातेवाईक वापरत असतात. यासाठी दर दोन वर्षांनी जळाऊ लाकडांकरिता पालिक प्रशासन कंत्राट देत असते. त्यानुसार, या आर्थिक वर्षात ५४ स्मशानभूमींसाठी ३ लाख १४ हजार २५८ क्विंटल लाकडे मागविण्यात आली आहेत.