मूर्तिकारांना अनुदान जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:51+5:302021-04-23T04:06:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे गरीब श्रमिकांना मोठा फटका बसला आहे. मदत म्हणून सरकारने फेरीवाले ...

Demand for grants to sculptors | मूर्तिकारांना अनुदान जाहीर करण्याची मागणी

मूर्तिकारांना अनुदान जाहीर करण्याची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे गरीब श्रमिकांना मोठा फटका बसला आहे. मदत म्हणून सरकारने फेरीवाले आणि समाजातील इतर घटकांसाठी पॅकेजची घोषणा केली. परंतु या मदत निधीमध्ये मूर्तिकार नाहीत. परिणामी, मूर्तिकारांना अनुदान जाहीर करण्याची मागणी त्यांच्याकडून हाेत आहे.

फेरीवाले आणि इतर माथाडी कामगार हे वर्षभर कमवत असतात. परंतु मूर्तिकारांची कमाई वर्षातून एकदाच, म्हणजे गणेशोत्सवात होते. मूर्तिकार कामगारांनाही मदत निधीची गरज आहे. यासाठी, गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण देसाई यांनी समाजमाध्यमातून मुख्यमंत्र्यांना मूर्तिकार कामगारांसाठी अनुदान जाहीर करून त्यांची मदत करावी, अशी विनंती केली.

मूर्तिकार हे उत्सवाच्या ४ ते ५ महिन्यांआधी गणपतींच्या मूर्ती बनवण्याची तयारी सुरू करतात. परंतु गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मूर्तिकार कामगारांचे खूप नुकसान झाले. यंदा ५ महिन्यांआधीच नियमावली द्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण देसाई यांनी केली. शाळा बंद असल्यामुळे या शाळा मूर्तिकारांना गणपतीचे कारखाने म्हणून कमी भाडेदराने देण्यात याव्यात, असे मूर्तिकार राहुल मोघे यांनी सांगितले. तर गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्षही लवकरच लेखी पत्राद्वारे मूर्तिकारांसाठी अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करणार आहेत.

......................................

Web Title: Demand for grants to sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.