Join us

निवडणुकीत ‘हॅकर्स’नाही डिमांड

By admin | Published: February 20, 2017 5:57 AM

राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना उमेदवार स्वत:च्या प्रचाराबरोबरच विरोधक, प्रतिस्पर्धी

जमीर काझी / मुंबईराज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना उमेदवार स्वत:च्या प्रचाराबरोबरच विरोधक, प्रतिस्पर्धी उमेदवारांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने वापर करीत आहेत. ‘प्रेमात आणि युद्धात सगळे माफ असते’ या उक्तीप्रमाणे पालिकेत शिरकावासाठी कराव्या लागणाऱ्या या युद्धात डिजिटल टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया त्यांचे मोठे हत्यार बनले आहे. या नकारात्मक प्रचारासाठी ‘हॅकर्स’ना डिमांड वाढत आहे.प्रत्येक उमेदवार एक वेळ आपली प्रसिद्धी नाही झाली तरी चालेल, पण प्रतिस्पर्ध्यांची नक्की बदनामी व्हावी, यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मेंबर फोडणे, ई-मेल, फेसबुकवरील माहिती हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ‘हॅकर्स’ची धास्ती घेऊन प्रत्येक उमेदवार माहिती तंत्रज्ञान व सोशल मीडियातील तज्ज्ञ, जाणकारांना प्रचाराच्या टीममध्ये महत्त्वाचे स्थान देत आहेत. त्यासाठी त्यांना मोठ्या पॅकेजबरोबर विविध आमिषे दाखविली जात आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात वापर झाला. तेव्हा राजकीय पक्ष, नेतेमंडळींनी या तंत्रज्ञांच्या साहाय्याने आपला प्रचार खुबीने केला होता. आता मात्र परिस्थिती बदलली असून स्वत:च्या प्रचाराबरोबरच विरोधकांची वैयक्तिक माहिती उपलब्ध करणे आणि त्याचा प्रभाव असलेल्या परिसरात ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी बनावट वेबसाइटचा वापर करून हॅकिंगचे प्रकार केले जात असल्याचे आयटी तज्ज्ञ जमशेद बारडीवाला यांनी सांगितले.या कामी प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांनी आपल्या क्षमतेप्रमाणे वॉररूम बनविला आहे. यात माहिती मिळविण्यासाठी हेरगिरी करणे, त्याची माणसे फोडण्यासाठी मोठी रक्कम व अन्य आमिषे दाखविली जात आहेत. हॅकर, ट्रोलरचे साहाय्य त्यासाठी घेतले जात आहे. त्यातून एखादी माहिती मिळाल्यानंतर ती प्रसारित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा मोठ्या खुबीने वापर केला जात आहे. विरोधकाची एखादी गुप्त माहिती मिळाल्यानंतर ती पाठविली जाते. तेथून ती सगळीकडे ‘व्हायरल’ होते. नकारात्मक प्रचारासाठी त्याचा वापर होत असून यासाठी लाखो खर्च करण्याची तयारी काही विरोधक दाखवत आहेत.