मुंबई : हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ हे देशातील प्रतिविष व रक्तजल, अँटिस्नेक व्हेनम उत्पादन करणारी संस्था आहे. या संस्थेच्या औषधांची आता येमेन या पश्चिम आशियाई देशाने मागणी केली आहे. यात महामंडळाच्या सर्पदंश प्रतिविष, विंचुदंश प्रतिविष, श्वानदंश प्रतिविष आणि प्रतिधनुर्वात लसींच्या समावेश आहे.हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ संस्थेचे पिंपरी पुणे येथे मोठे उत्पादन केंद्र आहे. या ठिकाणी हजार घोडे आणि अश्ववर्गीय प्राणी आहेत, त्यांच्या साहाय्याने सर्पदंश प्रतिविष, विंचुदंश प्रतिविष, श्वानदंश प्रतिविष आणि प्रतिधनुर्वात लस तयार करण्यात येते. हाफकिन महामंडळाने फ्रान्सवरून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित लायोफिलायझेशन यंत्र खरेदी केले होते. या यंत्रामुळे द्रव स्वरूपातील सिरमचे पावडर स्वरूपात परिवर्तन होते. त्यामुळे औषधाचा कार्यकाळ वाढण्यास मदत होते आहे. त्याचप्रमाणे, ही औषधे शीतपेटीत न ठेवता सामान्य तापमानातदेखील साठवून ठेवता येतात. आशिया खंडातील सर्वात विषारी साप असलेल्या नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या सापांचे विष एकत्रित करून त्यापासून पोलीव्हॅलंट अँटिस्नेक व्हेनम म्हणजे सर्व प्रकारच्या सर्पांच्या विषावर परिणामकारक असे एकमेवर प्रतिविष पिंपरीत तयार करण्यात येते.याविषयी अधिक माहिती देताना महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले की, या औषधांच्या उत्पादन निर्मितीविषयी माहिती घेण्याकरिता येमेन देशाच्या प्रतिनिधी मंडळाने हाफकिन महामंडळाच्या पिंपरी विभागाला भेट दिली आणि येथे उत्पादित करण्यात येणारी औषधे ही येमेन देशाला उपयुक्त होऊ शकतात का, याची तपासणी केली. त्यानंतर महामंडळाला जीवरक्षक औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.औषधे तयार, कार्यवाही सुरूयेमेन या पश्चिम आशियाई देशातून सर्पदंश प्रतिविष औषधांच्या तीन हजार कुप्या, विंचुदंश प्रतिविष औषधांच्या १०००, श्वानदंश प्रतिविष औषधांच्या ५००० आणि प्रतिधनुर्वात लसींच्या १० हजार कुप्यांची मागणी महामंडळाला आली आहे. ही जीवरक्षक औषधे तयार असून त्यांचा येमेन देशाला पुरवठा करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
हाफकिनच्या औषधांना येमेनमधून मागणी, चार प्रकारच्या लसींचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:51 AM