लसींचा तुटवडा त्वरित दूर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:06 AM2021-04-27T04:06:42+5:302021-04-27T04:06:42+5:30
मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसींचा मर्यादित साठा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून जी सुरू आहेत तिथे ...
मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसींचा मर्यादित साठा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली असून जी सुरू आहेत तिथे तोबा गर्दी उसळली असून लांबचलांब रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लसींचा हा तुटवडा केंद्र सरकारने त्वरित दूर करण्याची मागणी जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी केली.
मुंबईत रोज एक लाख लस देण्याचे लक्ष्य महानगरपालिकेने ठेवले असले तरी केंद्राकडून साठ हजार लसीच पुरविल्या जात आहेत. खासगी लसीकरण केंद्रांना लसी पुरविण्यात येणार नसल्याने दिवसागणिक खासगी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी दुसऱ्या वेळी घेण्यात येणाऱ्या डोससाठी ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य लोकांच्या रंगेतच उभे राहावे लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. साधारण अर्ध्या, पाऊण तासाने नंबर येत असल्याने व बाहेर रांगेत उन्हात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे मुंबईला जेवढा दैनंदिन साठा हवा आहे तो तातडीने केंद्राने उपलब्ध करून द्यायला हवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी केली.
लसीकरण केंद्रांवरील अनेक ठिकाणी रांगेत उभ्या राहणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व डोक्यावर छप्पर नसल्याने चक्कर येऊन कोणी पडले तर याची जबाबदारी कोणाची ? असा सवालही त्यांनी केला.
आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. तेव्हा लस नाही म्हणून एखादे लसीकरण केंद्र बंद करावे लागले असे होता कामा नये, असेही ते म्हणाले.
----------------------