लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आचार्य रजनीश तथा ओशो यांच्या पश्चात पुण्यातील ओशो आश्रमात संचालकांनी अनेक गैरकारभार केले आहेत. आश्रमाची पुण्यातील आठ एकर जमीन विद्यमान संचालकांनी विकली आहे. त्याविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे ३ हजार २०० लोकांनी आक्षेप नोंदविले आहेत. आश्रमाच्या नावाने संचालक मंडळी गैरव्यवहार करीत असून त्याची भारत सरकारकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ओशो यांच्या अनुयायांनी केली शुक्रवारी केली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ओशो अनुयायांची बैठक झाली. यावेळी ओशो अनुयायांचे प्रमुख योगेश ठक्कर ऊर्फ स्वामी योगेश, आरपीआयचे उपाध्यक्ष कृष्ण मिलन शुक्ला, माँ आरती राजधान, हेमा बावेजा ठक्कर आदी उपस्थित होते. ओशो ट्रस्टवर प्रशासक नेमण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविणार तसेच ओशो आश्रमात बुद्ध हॉलमध्ये लावण्यात आलेली भगवान बुद्धांची मूर्ती ओशो ट्रस्टने काढली असून तिथे पुन्हा बुद्धमूर्ती स्थापन करावी, अन्यथा आरपीआय ओशो आश्रमात घुसून बुद्धमूर्ती उभारेल असा इशारा रामदास आठवले यांनी यावेळी दिला.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे ओशो आश्रमाची वीस एकर जागा आहे. ती बेकायदेशीरपणे विकण्याचा डाव आश्रम संचालकांचा आहे. जमीन विकल्यानंतर त्याचा पैसा थेट परदेशात पाठविण्यात येत आहे. ओशो आश्रमात प्रवेशासाठी पाच हजार रुपयाचे शुल्क घेतले जाते. त्यातून मिळणारा कोट्यवधींचा निधी परदेशातील बँक खात्यात पाठविला जात आहे. ओशो यांची पुस्तके आणि इतर वस्तूंची कोट्यवधींची रॉयल्टी ओशो इंटरनॅशनलच्या नावाने परदेशात जात आहे. ओशो हे जन्माने, कर्माने भारतीय आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, उपदेशाचा कमाईसाठी वापर करणे, पुस्तकांवर रॉयल्टी असू शकेल पण विचारांवर रॉयल्टी कशी मागू शकाल असा सवाल करीत ओशो यांनी नि:स्वार्थ सेवेला महत्त्व दिले आहे. मात्र ओशो इंटरनॅशनल ही ट्रस्ट ओशो यांच्या आश्रमाच्या पवित्र्याचा भंग करीत आश्रमाला रिसॉर्ट करून कमाईचे साधन बनवत असल्याचा आरोप उपस्थित अनुयायांनी केला.