दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी, लवकरच अमलबजावणी होईल - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:44 PM2019-06-13T13:44:11+5:302019-06-13T13:46:14+5:30
'अंतर्गत गुण कमी होऊनही 80 गुणांच्या पेपरला 3 तास आणि 100 गुणांच्या पेपरलाही 3 तास ही चूक झाली.'
मुंबई : अकरावी प्रवेशावरुन निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत माहिती देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक झाली. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंतर्गत गुण आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या वाढविण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच त्याची अमलबजावणी होईल.'
याचबरोबर, अंतर्गत गुण कमी होऊनही 80 गुणांच्या पेपरला 3 तास आणि 100 गुणांच्या पेपरलाही 3 तास ही चूक झाली. त्याचा फटका राज्यभराच्या निकालाला बसला आहे. सातत्यपूर्ण निकालासाठी अंतर्गत गुण आवश्यकच आहेत. इतर मंडळाचे गुण कमी केल्यास ते कोर्टात जाणार, त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला आणखी उशीर होऊन पुन्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार त्यापेक्षा आम्ही मांडलेल्या मागण्या रास्त आणि योग्य आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
याशिवाय, अकरावीच्या जागा वाढविणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर अमलबजावणी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
अंतर्गत गुणांमुळे SSC च्या टक्केवारीवर परिणाम झाल्याने याविषयी चर्चा करण्यासाठी मी आज @CMOMaharashtra ना भेटलो.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 12, 2019
मा. मुख्यमंत्र्यांनी खालील मुद्यांवर त्यांची सहमती दर्शवली आहे:
1) SSC बोर्डच्या परीक्षेसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून अंतर्गत अंक पुन्हा ग्राह्य धरले जातील.
(1/2)
२) अंतर्गत अंकांच्या गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त यावर्षी महाविद्यालयांमध्ये विशेष तुकडी सुरु केली जाईल.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 12, 2019
(2/2)