मुंबई विद्यापीठात जीएसटी अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 02:49 AM2019-06-13T02:49:44+5:302019-06-13T02:50:05+5:30
कित्येक लहान व्यवसायिकांना जीएसटीसंदर्भात संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना सीएवर अवलंबून राहावे लागते.
मुंबई : भारतात जुलै २०१७ पासून जीएसटी कर लागू करण्यात आला. त्यामुळे दर महिन्याला जीएसटी भरून देणाऱ्या आणि सदर विषयाची संपूर्ण माहिती असणाºया तरुणांची मागणी लहान-मोठ्या उद्योगांत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी जीएसटी संदर्भातील संपूर्ण माहिती असणारा शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्याची मागणी युवासेना सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना निवेदनाद्वारे केली.
कित्येक लहान व्यवसायिकांना जीएसटीसंदर्भात संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना सीएवर अवलंबून राहावे लागते. तरुणांना जीएसटीची संपूर्ण माहिती दिल्यास त्यांच्यासाठी रोजगाराचे नवे दालन खुले होईल, असे मत युवासेना सिनेट सदस्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात निवेदन देताना युवासेनेचे प्रदीप सावंत, शीतल शेठ देवरुखकर, वैभव थोरात, राजन कोळंबेकर हजर होते. जीएसटी प्रणालीत सी-जीएसटी, आय-जीएसटी, एस-जीएसटी ही कर पद्धत कशी लागू करण्यात येते आदी माहितीचा अभ्यासक्रम सुरू झाल्यास विद्यापीठातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास हातभार लागेल, असे मत सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी व्यक्त केले.