Join us

पालिका रुग्णालयात गांधील माशीवर औषधे उपलब्ध करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 6:45 AM

बोरीवलीत गेल्या महिन्यात पंकज शाह यांना गांधील माशी चावून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता, तर येथील प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धिविनायक सोसायटीतील झाडे कापताना लाकूडतोड्या मधमाशी चावल्यामुळे जखमी झाला होता.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : बोरीवलीत गेल्या महिन्यात पंकज शाह यांना गांधील माशी चावून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता, तर येथील प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धिविनायक सोसायटीतील झाडे कापताना लाकूडतोड्या मधमाशी चावल्यामुळे जखमी झाला होता.बोरीवलीत गांधील व मधमाश्या चावण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बोरीवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात माहिती घेतली असता पालिका रुग्णालयात गांधील व मधमाश्यांनी चावा घेतल्यास त्यावर औषधेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात पीडित रुग्णावर लवकर यावर प्रभावी इलाज करणारी औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. तसेच, कीटक नियंत्रण विभागाला याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे व फवारणीसाठी पुरेशी यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील नगरसेवक जितेंद्र पटेल यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून  केली आहे.यासंदर्भात लोकमत ऑनलाईन व लोकमत मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.पालिका प्रशासनाकडे शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी मधमाश्यांची पोळी काढण्यासाठी पालिकेची स्वतंत्र यंत्रणा हवी अशी आग्रही मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती.लोकमतच्या वृत्ताची दखल घेत मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात मधमाश्यांची पोळी नष्ट करणे ही धोक्याची घंटा ठरेल अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

टॅग्स :मुंबई