लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य राखीव दलाचे जवान मनोहर पाटील यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून पैशांची मागणी करण्यात आल्याचे समाेर आले आहे.
पाटील यांच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रमंडळींकडे अडचणीत असल्याचे सांगून ठगाने पैशांची मागणी केली. त्यानुसार, पाटील यांच्या गुजरातला राहणाऱ्या चुलत भावाने ठगाला १ लाख रुपये पाठवले. पुढे पैसे मिळाल्यानंतरही काही प्रतिसाद न आल्याने त्याने पाटील यांना कॉल करून चौकशी केली, तेव्हा त्यांनी आपण पैशांची मागणी केली नसल्याचे सांगितले. अनेक मित्रांकडे अशाप्रकारे पैशांची मागणी केल्याचे समजताच त्यांनी उत्तर प्रादेशिक सायबर सेलमध्ये तक्रार केली. त्यानुसार, ज्या खात्यावर पैसे पाठवले होते, पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करून ते खाते गोठवले. त्यामुळे अनेकांचे पैसे वाचले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.