नवीन पोलीस ठाण्यासाठी पालिकेच्या वास्तूची मागणी
By admin | Published: November 3, 2014 11:26 PM2014-11-03T23:26:46+5:302014-11-03T23:26:46+5:30
राज्याच्या गृहविभागाने वासिंद, मीरारोडच्या नयानगरसह, नालासोपारासह तुळिंज परिसरांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यांना सहा महिन्यांपूर्वी मंजूरी दिली असली तरी ही ठाणी जागेअभावी अद्याप सुरू झाली नाहीत.
राजू काळे, भार्इंदर
राज्याच्या गृहविभागाने वासिंद, मीरारोडच्या नयानगरसह, नालासोपारासह तुळिंज परिसरांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यांना सहा महिन्यांपूर्वी मंजूरी दिली असली तरी ही ठाणी जागेअभावी अद्याप सुरू झाली नाहीत. मीरारोड पोलिसांनी नयानगर पोलीस ठाणे तात्पुरते सुरू करण्यासाठी पालिकेच्या वास्तूची मागणी केली आहे.
मीरारोडचा वाढता व्याप लक्षात घेता नयानगर परिसरात नवीन ठाणे सुरू करण्याची मागणी दरम्यानच्या काळात जोर धरू लागली. त्यानुसार, ग्रामीण पोलिसांनी सुमारे दीड वर्षापूर्वी राज्याच्या गृहविभागाकडे नयानगर पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर गृहविभागाने ४ मार्च २०१४ ला शिक्कामोर्तब केल्याने नवीन पोलीस ठाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, मंजूरी मिळालेल्या या ठाण्याची वास्तू उभी करण्यास पोलीस प्रशासनाकडे अद्याप जागाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. जागा मिळत नसल्याने मीरारोड पोलिसांनी पालिकेला पत्र पाठवून त्यात तात्पुरत्या स्वरूपात नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी पालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय क्र. ५ मधील तळमजल्याची मागणी केली आहे. याबाबत, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश अंबुरे म्हणाले की, नयानगर जागेच्या मागणीच्या पत्राबाबत अद्याप आपल्याला कल्पना नाही.