मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील या उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या मलबार हिल भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे.मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासून उच्चारले जाते. मात्र मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेलेप्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांनाही या भागाची भुरळ पडली. त्यांनीही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ करावे, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अशा प्रकारची नामकरण करण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्रिटिश काळातील नावे बदलण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.त्यानंतर आता मलबार हिलच्या नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे आली आहे. ही ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे.>असे सुरू झाले नामकरणब्रिटिश काळापासून बॉम्बे म्हणून ओळख असलेल्या मुंबापुरीचे नाव १९९५ मध्ये बदलून मुंबई करण्यात आले. त्यानंतर ब्रिटिश काळात देण्यात आलेली सर्व नावे बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. या नामकरणाची सुरुवात व्हिक्टोरिया टर्मिनसपासून झाली. पश्चिम उपनगरातील गोरेगाव आणि जोगेश्वरीमधील नवीन स्थानकाचे नाव राम मंदिर ठेवण्यात आले. १९ जुलै २०१८ पासून एल्फिन्स्टन रोड स्थानक ‘प्रभादेवी’ असे ओळखले जाऊ लागले. तसेच १८३५ ते १८३९ या काळात त्या काळातील बॉम्बेचे राज्यपाल असलेले सर रॉबर्ट ग्रॅण्ट यांच्या नावाने असलेले ग्रॅण्ट रोड स्थानकाचे नाव बदलून ग्रामदेवी, करी रोड स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी तर हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकाचे नाव काळाचौकी, रे रोडचे नाव घोडपदेव करण्याची मागणी होत आहे.
मलबार हिलचे नाव रामनगरी करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:05 AM