Join us

तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी पाच लाखांची मागणी, आर्थिक गुन्हे शाखेचा लाचखोर पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By मनीषा म्हात्रे | Published: October 09, 2024 8:24 PM

Crime News: आर्थिक फसवणुकीतील गुंतवणूकदाराचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यासाठी अधिकाऱ्याने गुंतवणुक केलेल्या रक्कमेच्या दहा टक्के म्हणजे ४ लाख ९० हजार १७० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी ) कारवाईतून समोर आला.

- मनीषा म्हात्रे मुंबई - आर्थिक फसवणुकीतील गुंतवणूकदाराचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यासाठी अधिकाऱ्याने गुंतवणुक केलेल्या रक्कमेच्या दहा टक्के म्हणजे ४ लाख ९० हजार १७० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी ) कारवाईतून समोर आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष ८ चे पोलीस निरीक्षक महेंद्र वासुदेव सावर्डेकर असे अधिकाऱ्याचे नाव असून दोन लाखांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मूळचे  तमिळनाडू येथील रहिवासी असलेले ३३ वर्षीय तक्रारदार यांनी ब्लिस कन्सल्टन्सी या कंपनी मध्ये ४९ लाख ४४ हजार १७० रुपयांची गुंतवणूक केली. या कंपनीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत एमपीआयडी अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावर्डेकर या गुन्ह्याचे तपास अधिकारी असल्याने तक्रारदार यांनी देखील त्यांचा अर्ज त्यांच्यापुढे सादर करत पैसे मिळवून देण्याची विनंती केली. सावर्डेकर यांनी याप्रकरणात त्यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यासाठी गुंतवणुकीच्या १० टक्के म्हणजे ४ लाख ९० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने त्यांना धक्का बसला. तक्रारदार यांनी ८ ऑक्टोबर रोजी एसीबीकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली. पडताळणीत पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, बुधवारी एसीबीच्या पथकाने सापळा कारवाईत सावर्डेकर यांना यालोगेट पोलीस ठाण्याच्या इमारतीत २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत एसीबीकडून तपास सुरु आहे.

टॅग्स :लाच प्रकरणगुन्हेगारी