कोविड काळातील २७६४ कोटींची राज्य सरकारकडे मागणी; महापालिकेचा निधीसाठी पाठपुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:43 PM2022-02-04T20:43:47+5:302022-02-04T20:45:34+5:30
कोविड व्यवस्थापनासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांच्या कालावधीत दोन हजार ७६४ कोटी रुपये खर्च केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविड व्यवस्थापनासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांच्या कालावधीत दोन हजार ७६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापैकी पहिला लाटेदरम्यान ८० कोटी रुपये पालिकेला प्राप्त झाले होते. आता उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर झपाट्याने बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. मागील दोन वर्षांच्या कालावधीत १० लाख ५० हजार १९४ मुंबईकर बाधित झाले होते. यापैकी ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १६ हजार ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या दैनंदिन रुग्ण वाढीचा दर ०.१० टक्के आहे.
यावर झाले खर्च...
कोरोनाच्या पहिला लाटेदरम्यान बाधित क्षेत्रांमध्ये नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा, कर्मचाऱ्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, मास्क खरेदी, औषधांची खरेदी यासाठी खर्च करण्यात आले. महापालिकेने मोठ्या प्रमाणात कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांना घेतले. तर दुसरा लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ऑक्सिजन निर्मिती त आत्मनिर्भर होण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले. तसेच तिसऱ्या लाटेवेळी मुंबईत २६६ विनामूल्य चाचणी केंद्रे, तीन मोठी जंबो कोविड केंद्र उभारण्यात आली. महापालिकेने कोविड व्यवस्थापनासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत १४१७.३२ कोटी आणि अन्य कामांसाठी १३४७.५६ एवढी रक्कम खर्च केली आहे.