वर्क फ्राॅम होमचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संकटामुळे जगभरात दाखल झालेली मंदी आणि वाढत्या वर्क फ्राॅम होम कल्चरमुळे कार्यालयीन जागांच्या मागणीत पुढील दोन वर्षांत सुमारे २० टक्यांपर्यंत घट नोंदविली जाण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रात सक्रिय असलेल्या विविध सल्लागार कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी पहिल्या ९ महिन्यात देशात ३ कोटी २० लाख चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या कार्यालयीन जागांचे व्यवहार झाले होते. यंदा पहिल्या ९ महिन्यांत तो आकडा जेमतेम १ कोटी ७० लाख चौरस फुटांपर्यंत गेला होता. गतवर्षीपेक्षा किमान ४० ते ५० टक्के कमी व्यवहार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शेवटच्या तिमाहीत या जागांची मागणी बऱ्यापैकी वाढलेली दिसत आहे. त्यामुळे यंदा २ कोटी २५ लाख चौ. फू. क्षेत्रफळ जागेएवढे व्यवहार होतील असा अंदाज आहे. मात्र, कोरोना संकटाचे ढग दूर झाले तरी पुढल्या वर्षी या जागांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी चिन्हे दिसत नसल्याचे निरीक्षण या सल्लागार संस्थांनी व्यक्त केले आहे. पुढल्या वर्षी सुमारे ३ कोटी चौ. फु. जागेची देवाण घेवाण होईल असे सांगितले जात आहे. गेल्या दहा वर्षांतल्या सरासरी व्यवहारांचा आलेख मांडल्यास तो तीन कोटी चौरस फुटांपर्यंतच जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत तो कमीच असेल. हा ट्रेण्ड केवळ २०२१ नाही तर २०२२ सालीसुध्दा कायम राहिल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
यामुळे घटली मागणी
गेल्या आठ महिन्यांतील विविध निर्बंधांमुळे वर्क फ्राॅम होमच्या कल्चरमध्ये वाढ झाली आहे. ही कार्यपध्दती बहुसंख्य कार्यालयीन कामकाजाच्या पथ्यावर पडणारी ठरली आहे. त्यामुळे निर्बध शिथिल झाले असले तरी अनेक ठिकाणची कार्यालये पुन्हा सुरू न करता घरूनच कामकाज ककरण्याची मुभा कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. त्याशिवाय मंदीमुळे व्यवहारांवरही अनेक निर्बंध आले असून अनेक कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी काॅस्ट कटिंगचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे जागांच्या मागणीत घट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.