लोकल मार्गादरम्यान हवी संरक्षण भिंत, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:35 AM2018-10-21T06:35:53+5:302018-10-21T06:36:02+5:30

रेल्वे स्थानकादरम्यान रुळालगत कुंपण उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे स्थानकात याची पूर्तता झालेली नाही.

Demand for Railway Protection Organization, Local Travel | लोकल मार्गादरम्यान हवी संरक्षण भिंत, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

लोकल मार्गादरम्यान हवी संरक्षण भिंत, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

Next

मुंबई : रेल्वे स्थानकादरम्यान रुळालगत कुंपण उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे स्थानकात याची पूर्तता झालेली नाही. यामुळे एखाद्या दुर्घटनेची वाट न पाहता, दुर्घटना टाळण्यासाठी उपाय करण्याची गरज असल्याची मागणी सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी केली.
अमृतसर येथील रावणदहन कार्यक्रमावेळी झालेल्या अपघातामुळे देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, भारतीय रेल्वे विशेषत: मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनासाठी ही धोक्याची घंटा आहे. मध्य, पश्चिम रेल्वेच्या बहुतांश रेल्वे स्थानकादरम्यान संरक्षण भिंत नसल्यामुळे, उपनगरीय रेल्वे मार्गावर अमृतसर दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण-कसारा आणि कर्जत तर हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकापर्यंत मध्य रेल्वेचा विस्तार आहे. सीएसएमटी ते ठाणे पट्ट्यात काही प्रमाणात रेल्वे स्थानकादरम्यान रुळालगत भिंतीचे कुंपण दिसते. मात्र, ठाणे ते कसारा-कर्जत टप्प्यात भिंतीचे कुंपण उभारण्याची गरज आहे. नुकतेच कल्याण ते आंबिवली टप्प्यात भिंतीचे कुंपण उभारण्यात आले आहे, परंतु अद्यापही मध्य रेल्वे मार्गावर संपूर्णपणे भिंतीच्या कुंपणाचे काम झालेले नाही. प्रशासनाने तातडीने हे काम जलद गतीने करणे गरजेचे आहे. जेथे संरक्षण भिंत उभारणे शक्य नाही, अशा ठिकाणी लोखंडी रेलिंग उभारण्यात यावी, असे मत कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश राऊत यांनी व्यक्त केले.
रेल्वे प्रवासी संघटनेचे आंबिवली स्थानक प्रमुख रमण विष्णू तरे यांनी सांगितले की, मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर अमृतसरसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानक अथवा रेल्वे रूळ परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असलेल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. मुंबई लोकलवरील रेल्वे क्रॉसिंग गेट लवकरात लवकर बंद करून, वाहनांना पर्यायी मार्गासाठी रोड ओव्हर ब्रीज (आरओबी) त्वरित उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
>... तर प्रवाशांच्या समस्या कशा कळणार
ज्या अधिकाऱ्यांना प्रवासी संघटनांना भेटायला वेळ नाही, प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यात रस नाही, त्यांना प्रवाशांच्या समस्या कशा कळणार, असा प्रश्न रेल्वे मंत्रालयाच्या मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य आणि महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी उपस्थित केला आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) एस. के. जैन यांना भेटण्यासाठी गेले असता ते नेहमी व्यस्त असल्याचे सांगण्यात येते. संरक्षण भिंतीबाबत विचारणा केली असता, ‘मॅडम आपका निवेदन उपर भेजा है,’ या पलीकडे डीआरएम कार्यालयातून कधीच ठोस उत्तर मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली, तर डीआरएमशी संपर्क साध्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
मध्य रेल्वे मार्गावर संपूर्णपणे भिंतीच्या कुंपणाचे काम झालेले नाही. प्रशासनाने हे काम जलद गतीने करणे गरजेचे आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Demand for Railway Protection Organization, Local Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.