Join us  

मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी

By admin | Published: January 26, 2016 3:12 AM

रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवताना मध्य रेल्वेकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे

डोंबिवली : रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवताना मध्य रेल्वेकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्याची दखल घेऊन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही याबाबत खंत व्यक्त केली व मध्य रेल्वेवर फेऱ्या वाढवण्याची मागणी केली.विशेषत: ठाणे ते कल्याण या पट्ट्यात गेल्या काही दिवसांत लोकलमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले होते. त्या वेळी प्रवाशांसह संघटनांच्या भावनांची दखल घेऊन, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उपनगरीसेवेत तातडीने सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. मात्र, त्यानंतरही लोकलच्या फेऱ्या वाढवताना, रेल्वे प्रशासनाने दुर्लक्षच केल्याची बाब समोर आली आहे.याची दखल घेऊन त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांना पत्र देऊन, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याणदरम्यान सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. हार्बर मार्गावरील फेऱ्या वाढवल्याबद्दल मध्य रेल्वेचे अभिनंदन करतानाच, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या स्थानकांवरची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, या मार्गांवर अपघातांचे प्रमाणदेखील वाढले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)