बनावट अश्लील चॅट व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:27+5:302021-04-05T04:06:27+5:30
सराफाची वांद्रे पोलिसांत धाव; गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून अश्लील चॅटचे स्क्रीनशॉट पाठवून ते ...
सराफाची वांद्रे पोलिसांत धाव; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून अश्लील चॅटचे स्क्रीनशॉट पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका सराफाकडे अडीच लाखांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी सराफाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे पश्चिमेत ४० वर्षीय तक्रारदार सराफा व्यावयासिक कुटुंबीयांसोबत राहतात. २ एप्रिल रोजी ते दुकानात असताना त्यांच्या मैत्रिणीने फोन करून सांगितले की, तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा अश्लील व्हिडीओ चॅटचा स्क्रीनशॉट आला आहे. तिने ताे स्क्रीनशॉट त्यांना व्हाॅट्सॲप केला. मात्र, अशाप्रकारे कधीही चॅट केला नसल्याचे त्यांनी मैत्रिणीला सांगितले. बनावट आयडीवरून कुणीतरी ते चॅट पाठवल्याचा संशय त्यांना आला. दरम्यान, अन्य एका व्यक्तीने फाेन करून त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरून सराफा व्यावसायिकाने याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.
.......................