शैलेश्वर यांना पदावरून हटविण्याची मागणी, विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 02:37 AM2020-02-01T02:37:08+5:302020-02-01T02:37:24+5:30
लोकप्रतिनिधींनी या नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त करत, शैलेश्वर यांना या पदावरून दूर करावे आणि तातडीने नव्या डीनची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
मुंबई : तीस विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या डॉ. शैलेश्वर नटराजन यांची ठाणे महापालिका प्रशासनाने डीन पदावर वर्णी लावल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारी शहरात उमटले.
लोकप्रतिनिधींनी या नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त करत, शैलेश्वर यांना या पदावरून दूर करावे आणि तातडीने नव्या डीनची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. प्रशासनाकडून नव्या डीनच्या नियुक्तीसाठी शनिवारी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर, महिन्याभरात ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
२०१४ साली राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील तीस विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप शैलेश्वर यांच्यावर आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे त्या कॉलेजच्या डीनपदाची सूत्रे दिली. त्याबाबतच्या वृत्ताची दखल घेत महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शैलेश्वर यांच्या जागी तातडीने नव्या डीनची नियुक्ती करण्याचे आदेश दिले,
तर भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नटराजन यांना तत्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी महापौर आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीे, तसेच गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीची एवढ्या महत्त्वाच्या पदावर वर्णी लावण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. ठाणेकरांनी या प्रकाराचा निषेध नोंदवावा, अशा सविस्तर प्रतिक्रियेचा व्हिडीओ पेंडसे यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केला.