लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची ओळख आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मी. इतकी आहे. हे शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातील गिर्यारोहक आणि पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येथे येतात.
या शिखरावर पोहोचण्यासाठी कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या बसविल्या आहेत. यामुळे तीन ते चार तासांत शिखर सर करणे सहज शक्य होते. या शिड्या अरुंद व तोकड्या आहेत. यामुळे बऱ्याच वेळा गर्दी होते. पावसाळ्यात या शिड्यांवरून ये-जा करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे या शिड्यांची रुंदी वाढवून मोठ्या आकाराच्या रुंद शिड्या बसविणे गरजेचे असल्याची मागणी युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांनी राज्याचे पर्यटनमंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अंकित प्रभू यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात शिखरावर जाणाऱ्या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पर्यावरणपूरक बायो-टॉयलेट बसवावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे गिर्यारोहक, पर्यटकांची आणि विशेषतः महिलावर्गाची अडचण दूर होण्यास मदत होईल, असे प्रभू यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
-------------------------------------------