पालघर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असताना सफाळे (माकुणसार) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका पूनम पाटील या विद्यार्थ्यांना शिकविण्यात हयगय करीत असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला आहे. मागील एक वर्षापासून वरील शिक्षिकेच्या बदलीची मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त शालेय शिक्षण समितीसह पालकांनी आज गटविकास अधिकाऱ्यांना गराडा घालीत कारवाईची मागणी केली.सफाळे, माकुणसार येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये १ ली ते ४ थीच्या वर्गातून ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यांना शिकविण्यासाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी पूनम पाटील या शिक्षिका अध्यापनाचे काम व्यवस्थित करीत नसल्याने इ. १ लीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन आठ महिन्याचा कालावधी उलटून साधी मुळाक्षरेही वाचता येत नाहीत, तर इ. ३ रीच्या विद्यार्थ्यांचा सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला नसल्याचे तक्रारदार महिलांचे म्हणणे आहे. वर्ग सुरू असताना विद्यार्थी पटांगणात, तर काही इथे तिथे फिरत असल्याचे पालकांच्या अनेकवेळा निदर्शनास आले आहे. शिक्षिकेचे विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिले नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या शाळेतील प्रमुख शिक्षिका प्रशिक्षण, बैठक यासाठी बाहेर गेल्यास पूनम पाटील या शिक्षिका कधीही शाळा सोडून देत असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरुन धावताना अपघाताची शक्यताही पालकांनी आज गटविकास अधिकारी नलिनी अप्रे यांच्याकडे बोलून दाखविली. (वार्ताहर)
‘त्या’ शिक्षिकेच्या बदलीची मागणी
By admin | Published: July 04, 2014 12:52 AM