मुंबई: कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी काल सायंकाळी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सदर मागणी केली.
कोळी समजाला स्वातंत्र्याच्या 73 वर्षात समाजाला कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. मात्र भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करेल असे सभेत एकमताने ठरविण्यात आले अशी माहिती विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वी पासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात 1960 मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते परंतू परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय असे दिसून येते अशी टिका त्यांनी केली.
2014 च्या विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. 2014 च्या विधानसभानिवडणुकीत 'देता की जाता' चा नारा 2014 साली काँग्रेस आघाडी सरकारला पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची योग्य पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमीपूत्रांना खंत आहे असे डॉ.भानजी म्हणाले.
दरम्यान यावेळी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.