Join us

ब्रिदिंग एक्सरसायझरला मागणी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खप वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 7:22 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आपली काळजी घेत आहेत

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. शिवाय, फुप्फुसांवर त्याचा दुष्परिणाम होतो असे दिसून आले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांत ब्रिदिंग एक्सरसायझर्सची मागणी वाढली असून आॅनलाइन बाजारपेठेत याचा खप वाढत आहे.या ब्रिदींग एक्सरसायझर्सच्या वापरामुळे फुप्फुसांमध्ये झालेल्या संसर्गाचे प्रमाण कमी करण्यास मदत करत असल्याचे दावे केलेले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आपली काळजी घेत आहेत. मात्र या काळात समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या संदेश आणि व्हिडीओमुळे यापूर्वीही आॅनलाइन बाजारपेठेत सुरुवातीला थर्मल चेकर, कॅटल, वाफेचे मशीन, डिजिटल तापमापी, आॅक्सिमीटर यांची मागणी वाढलेली दिसून आली. सध्या बाजारात विविध कंपन्यांची, ब्रँड व किमतीची ब्रिदिंग एक्सरसायझर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांकडून याचा सर्रास वापर होताना दिसत आहे, याची किंमत साधारण हजार रुपयांच्या आत आहे. या उपकरणावर त्याच्या वापरासंबंधी माहिती दिलेली असल्याचे दवावाला मेडिकलचे संतोष शहा यांनी माहिती दिली आहे. याविषयी, श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. कौशिक जैन यांनी सांगितले, केवळ श्वसनासंबंधी अशा स्वरूपाचे टूल विकत घेण्याची आवश्यकता नाही. नियमित योगासन, ध्यानधारणा, प्राणायाम आणि व्यायाम केल्यासही आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु, अशा पद्धतीचे उपकरण वापरणे हे केवळ साहाय्यक व सोपी पद्धत म्हणून उपयुक्त आहे. मात्र याचा वापर करणे हे अनिवार्य नाही.आरोग्यासाठी लाभदायकच्अशा पद्धतीचे उपकरण वापरणे ही केवळ साहाय्यक व सोपी पद्धत म्हणून उपयुक्त आहे. मात्र याचा वापर करणे हे अनिवार्य नाही. ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास आहे, त्यांनी या काळात नियमित श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याव्यवसाय