Join us

जिमच्या साहित्याची मागणी वाढली, जिम बंद असल्याने तरुण घरातच करतात व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये काही गोष्टी सुरु तर काही ...

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये काही गोष्टी सुरु तर काही गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या लॉकडाऊन प्रमाणेच या मिनी लॉकडाऊन मध्ये देखील जिम बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे जिम मालकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. तसेच दररोज व्यायाम करण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना आता व्यायाम कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.

आपली व्यायाम करण्याची सवय सुटू नये यासाठी आता तरुणाई घरातच व्यायाम करत आहे. यासाठी लागणारे डंबेल्स, रॉड, बेल्ट तसेच इतर वजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी तरुण दुकानांवर येऊ लागले आहेत. मुंबईत मोहम्मद आली मार्ग दोन टाकी, धारावी, अंधेरी याठिकाणी स्वस्त दरात जिमचे साहित्य उपलब्ध आहे. अगदी ७० ते ८० रुपये किलो या दराने येथे साहित्य उपलब्ध असल्याने तरुण येथून हे साहित्य आपल्या घरी घेऊन जात आहेत. तर काही ठिकाणी घरपोच डिलिव्हरी दिली जात आहे.

ऑनलाईन शॉपिंग साइटवरून देखील या साहित्याची मागणी वाढली आहे. यासाठी ऑनलाइन साइटवर १५०० ते ३० हजार पर्यंत कॉम्बो ऑफर्स सुरू आहेत. त्यामुळे जिम बंद असल्या तरीदेखील अनेकजण घरातच मिनी जिम साकारत आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे गरजेचे आहे. यासाठी नियमित व्यायाम व चांगला आहार खाणे देखील गरजेचे आहे. याची जाणीव आता सर्वांना झाल्याने लॉकडाऊनच्या काळात घरातल्या घरातच व्यायाम करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

अफजल शेख (जिमच्या साहित्याचे व्यापारी, दोन टाकी ) - जिम बंद झाल्याने काही दिवसांपासून जिमच्या साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निर्बंध घातल्याने दुकान बंद ठेवावे लागत आहे. मात्र काहीजण साहित्य घरपोच मागवत आहेत.

प्रणित साळुंखे (रहिवासी, कुर्ला) - पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी अचानक सर्वकाही बंद झाल्याने घरात व्यायामाचे कोणतेच साहित्य आणून ठेवले नाही. यामुळे अनेक महिने व्यायामाची सवय सुटली आता लॉकडाऊनची चाहूल काही दिवसांपूर्वीच लागली होती. यामुळे घरात जिमचे साहित्य आणून ठेवले आहे. त्यामुळे आता दररोज घरातच व्यायाम करीत आहे.