कामगार संघटनांना विश्वासात घेऊन एसटीचा संप मिटवा, विखे पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 03:15 PM2017-10-17T15:15:53+5:302017-10-17T15:16:14+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ऐन दिवाळीत वाहतूक कोलमडली असून, सरकारने कामगार संघटनांना विश्वासात घेऊन हा संप मिटवावा आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ऐन दिवाळीत वाहतूक कोलमडली असून, सरकारने कामगार संघटनांना विश्वासात घेऊन हा संप मिटवावा आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसंच विखे-पाटील यांनी शिवसेनेलाही टोला लगावला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातून प्रवाशांना विशेषतः महिलांना असंख्य अडचणींना तोंड द्याव्या लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरकारने हा मुद्दा अधिक प्रतिष्ठेचा न करता तातडीने भूमिका घ्यावी, असं विखे पाटील यांनी म्हंटलं आहे.
परिवहन खात्याचे मंत्री हेच आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. सरकारमध्ये राहून सवंग लोकप्रियतेसाठी विरोध करणं सोपं असतं. पण सरकार म्हणून जबाबदारी निभावणं किती कठिण असतं, याची प्रचिती आता शिवसेनेला येत असेल. हे खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपाने जाणीवपूर्वक या आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, अशीही शंका विखे-पाटील यांनी उपस्थित केली आहे.
सरकारमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये असलेल्या विसंवादातून वेगवेगळ्या स्तरावर सातत्याने शह-काटशहाचे राजकारण खेळलं जात असून, त्याचेच पडसाद एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उमटले असण्याची शक्यताही विखे पाटील यांनी वर्तवली आहे. सरकार म्हणून शिवसेना सर्वसामान्य प्रवाशांच्या बाजूने असेल तर तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा. अन्यथा सरकारमधील जबाबदारी पार पाडता येत नाही म्हणून सत्तेतून बाजुला व्हावं, असंही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हंटलं आहे.