पाचशे चौरस फुटांच्या घरांसाठी आता काँग्रेसकडूनही करमाफीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:38+5:302021-01-08T04:13:38+5:30

मुंबई - पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी देणाऱ्या पालिकेने प्रत्यक्षात आता इतर करांची वसुली सुरू केली आहे. त्यामुळे आगामी ...

Demand for tax exemption from Congress for 500 square feet houses | पाचशे चौरस फुटांच्या घरांसाठी आता काँग्रेसकडूनही करमाफीची मागणी

पाचशे चौरस फुटांच्या घरांसाठी आता काँग्रेसकडूनही करमाफीची मागणी

Next

मुंबई - पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी देणाऱ्या पालिकेने प्रत्यक्षात आता इतर करांची वसुली सुरू केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा मुद्दा काँग्रेसनेही आता उचलून धरला आहे. त्यानुसार, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिका व गाळ्यांचा मालमत्ताकर संपूर्ण माफ करावा, ५०१ ते ७०० चौ. फुटांपर्यंतच्या गाळ्यांना मालमत्ताकरातून ६० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

राज्य शासनाने १० मार्च २०१९ रोजी राज्यपालांमार्फत अध्यादेश काढून मालमत्ताकरातला फक्त सर्वसाधारण कर माफ केला. परंतु जलकर, जललाभकर, मलनि:सारणकर, महापालिका शिक्षण उपकर, राज्य शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, वृक्ष उपकर व पथकर माफ करण्यात आला नाही. फक्त १० टक्के सर्वसाधारण कर माफ करण्यात आला. तसेच २०२०-२१ मध्ये थकबाकीसह मालमत्ताकर भरण्याचे आदेश महापालिकेने सदनिकाधारकांना दिले. ही देयके आता मालमत्ताधारकांना पाठवली जात आहेत.

मालमत्ताकर माफीची घोषणा करीत भाजपने २०१९ लोकसभा, विधानसभा निवडणुकांत भरघोस मते मिळवली. परंतु, संपूर्ण मालमत्ताकर माफ न करता करातील १० टक्के साधारण कर माफ करून त्यांनी मुंबईकरांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप भाई जगताप यांनी यावेळी केला. तसेच २०१७ च्या ठरावाप्रमाणे राज्य सरकारने त्वरित अध्यादेश काढून मुंबई मनपा अधिनियम १८८८ च्या कलम १४० व १४० अ मध्ये सुधारणा करून ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ताकर संपूर्णतः माफ करावा, अशी मागणी केली आहे.

झोपडीधारकांना मोफत पाणी...

संपूर्ण मुंबईतून पालिकेला पाणीपट्टीच्या रूपाने प्रतिमहिना ५०० कोटी महसूल मिळतो. तर, त्यातून १६२ कोटी हे झोपडपट्टीधारकांकडून मिळतात. टँकरमाफियांकडून गरिबांचे शोषण थांबवण्यासाठी झोपडपट्टीधारकांना मोफत आणि चांगले पाणी मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Demand for tax exemption from Congress for 500 square feet houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.